मध्य रेल्वेने कल्याण स्थानकातील वातानुकूलित प्रतीक्षागृह उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन दिवसांत यावर कार्यवाही सुरू होणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना शीतलता अनुभवता येणार आहे.
कल्याण स्थानकातून दररोज ८० हून अधिक रेल्वे ये-जा करतात. या काळात सुमारे दोन लाखांहून अधिक प्रवाशांची ने-आण करण्यात येते. गेल्या काही महिन्यांपासून वातानुकूलित विश्रांतिगृहे बंद अवस्थेत होती. त्या जागी नवी प्रतीक्षालये उभी करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दक्षिण आणि उत्तरेकडील राज्यांत; तसेच महाराष्ट्रातील विविध प्रांतात जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी कल्याण स्थानकात असते. रात्री-अपरात्री प्रवास करताना विश्रांतीत अडचण येऊ नये, म्हणून किफायतशीर दरात वातानुकूलित विश्रामगृहांची निर्मिती करण्यात आली होती; मात्र २०१३ मध्ये सुरू झालेली विश्रांतिगृहे ऑगस्ट २०१४ पासून बंद करण्यात आली.
प्रवाशांच्या अल्पप्रतिसादामुळे बंद झालेल्या या विश्रांतिगृहामध्ये बदल करून हे विश्रांतिगृहाचे रूपांतर वातानुकूलित प्रतीक्षागृहामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कल्याणचे स्थानक व्यवस्थापक ओ. पी. करोतिया यांनी दिली. ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचे आरक्षित तिकीट असलेल्या पुरुष प्रवाशांना विश्रांतिगृहामध्ये प्रवेश करता येत होता. त्यामुळे महिला प्रवाशांना त्याचा कोणताच लाभ होत नसल्याने या विश्रांतिगृहाकडे प्रवासी फिरत नव्हते. ठाणे स्थानकातील विश्रांतिगृह सुरू असले तरी कल्याण स्थानकातील विश्रांतिगृह अल्प प्रतिसादामुळे बंद करण्यात आले होते. या जागेचा पुनर्वापर करण्यासाठी या विश्रांतिगृहाचे रूपांतर प्रतीक्षागृहात करण्यात येणार असल्याचे करोतिया यांनी सांगितले.

विश्रांतिगृह आणि प्रतीक्षागृहातील
२०१३ मध्ये ठाणे आणि कल्याण स्थानकात विश्रांतिगृह सुरू करण्यात आले होते. वातानुकूलित आणि झोपण्यासाठी बेडची व्यवस्था असलेली विश्रांतिगृह उभारण्यात आली होती. मात्र त्यात महिला प्रवाशांना प्रवेश बंदी होती. त्यामुळे प्रतीक्षागृह तयार करण्यात येणार असून तेथे केवळ बसण्याची व्यवस्था तसेच प्रसाधनगृहाची व्यवस्था असेल, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

लांबपल्ल्यासाठी प्रतीक्षागृह हवे..
लांबपल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेले विश्रांतिगृह लांबपल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक होत असलेल्या पाच आणि सहा नंबर फलाटावर असणे गरजेचे आहे. रेल्वेच्या वतीने सुरू करण्यात येणारे नवे प्रतीक्षागृह फलाट क्रमांक एकवर तयार होणार असून त्यामुळे मोठे सामान, बॅग्ज घेऊन प्रवाशांना गाडी पकडणे अवघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा आहे म्हणून जुन्या विश्रांतिगृहाच्या जागी प्रतीक्षागृह सुरू करण्यापेक्षा नवे प्रतीक्षागृह लांबपल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक होत असलेल्या फलाटावर सुरू होण्याची गरज आहे, असे मत कल्याण-कसारा प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव यांनी व्यक्त केले आहे.