वायूमुळे नागरिकांचा श्वास कोंडला, खोकला, डोळे चुरचुरले

बदलापूर: बदलापुरात गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून वायू गळती झाल्याने पूर्वेतील शिरगाव, आपटेवाडी, दत्तवाडी, कात्रप, गावदेवी मंदिर परिसर भागात नागरिकांचा श्वास कोंडला. या भागात वायूचे साम्राज्य पसरले होते. दारे खिडक्या बंद करूनही नागरिकांना डोळे चुरचुरने, श्वास घेण्यास त्रास होणे, गरगरणे आणि उलटी मळमळचा त्रास जाणवला. या प्रकारामुळे तासभर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बदलापूर पूर्वेतील ग्लोबल इंटरमिडीएट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधून वायुगळती झाली. कंपनीत जनावरांचे खाद्य बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची प्रक्रिया केली जात होती. यात मेटानायट्रोबेनझाईम डीहाईड या कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जात असताना मिसळल्या जाणाऱ्या सल्फरचे प्रमाण अधिक झाल्याने वायू पसरल्याची माहिती कुळगाव बदलापूर अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली. मोठ्या प्रमाणावर वायू बदलापूर पूर्वेतील शिरगाव, आपटेवाडी, दत्तवाडी, कात्रप, गावदेवी मंदिर भागात वायू पसरला होता. या वायूचे प्रमाण इतके होते की बदलापूर कर्जत राज्यमार्ग दिसेनासा झाला होता. विचित्र प्रकारचा रासायनिक दर्प आल्याने नागरिकांनी तातडीने घराच्या खिडक्या आणि दारे बंद केली. मात्र त्यानंतरही परिसरात रसायनाचा दर्प तीव्रपणे जाणवत होता. या वायूमुळे अनेक नागरिकांना श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. अनेकांना डोळे चुरचुरणे, खोकला येणे, उलटी मळमळ वाटणे असे त्रास नागरिकांना जाणवले. घटनेची माहिती मिळताच बदलापूर अग्निशमन दल दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही मिनिटात कंपनीतील वायू गळतीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र मध्यरात्री बारा वाजेपर्यंत वायूचा दर्प जाणवत होता. रात्री उशिरापर्यंत या गळतीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलामे दिली. सुदैवाने नागरिक जागी असतानाच वायुगळती झाल्याने मोठा अनर्थ टळला. नागरिक साखर झोपेत असताना असा प्रकार झाला असता तर मोठा अपघात झाला असता अशी भीती अनेक नागरिक व्यक्त करत होते