|| आशीष धनगर

श्वसनाशी संबंधित विकारांत वाढ झाल्याचा तज्ज्ञांचा दावा; कल्याण-डोंबिवलीत परिस्थिती बिघडत असल्याचे निरीक्षण

रासायनिक कंपन्यांमुळे वाढलेले प्रदूषण, वाहनांची वाढती वर्दळ, विकासकामांमुळे निर्माण होणारी धूळ अशा विविध कारणांमुळे कल्याण, डोंबिवलीतील वायुप्रदूषणात मोठी वाढ होत असल्याचे निरीक्षण प्रदूषण नियंत्रण अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. यामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांची चर्चा सुरू असतानाच हवेच्या ढासळत्या गुणवत्तेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत असल्याचे बालरोगतज्ज्ञांच्या पाहणीत आढळून आले आहे. सर्दी, खोकला, पडसे, दमा यांसह श्वसनाशी संबंधित आजारांनी त्रस्त असलेल्या लहान मुलांची संख्या वाढत असल्याचे या पाहणीत आढळले आहे.

कल्याण-डोंबिवली शहर झपाटय़ाने वाढत असताना गेल्या काही वर्षांपासून या शहरांत रासायनिक कंपन्यांमधून होणारा प्रदूषणाचा मुद्दाही सातत्याने चर्चेला येत आहे. या रासायनिक कंपन्यांमधून मोठय़ा प्रमाणात वायुप्रदूषण निर्माण होते. काही वर्षांपूर्वी डोंबिवलीतील एमआयडीसी भागात हिरवा पाऊस पडल्याचा प्रकार झाला होता. हा प्रदूषणाचा प्रकार होता असे पर्यावरणतज्ज्ञांचे निरीक्षण होते. कल्याण, डोंबिवली या शहरांतील वाहनांची संख्या वाढली असून रस्ते मात्र अरुंद आहेत. त्यामुळे शहरात दररोज सकाळ संध्याकाळ वाहन कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या वाहनांतून कार्बन मोनॉक्साईडचे उत्सर्जन होत असते. त्यासोबतच नव्याने बांधकामे उभी राहू लागली आहेत. यामुळे शहरात धुलीकणांमध्ये प्रदूषण होत असून या सर्व घटकांचा परिणाम शहरातील शून्य ते १८ वयोगटातील मुलांवर होत आहे, असे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांचे आहे.

महापालिकेने केलेल्या पर्यावरण अहवालातही वायुप्रदूषणात काही ठिकाणी वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. असे असताना शहरातील रुग्णालयांमध्ये येणाऱ्या शंभरपैकी चाळीस रुग्ण सर्दी, खोकला आणि पडसे यामुळे त्रस्त असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यासोबतच शहरातील मुलांच्या आहारात जंक पदार्थाचा वापर वाढल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी झाल्याचे या निरीक्षणात आढळले आहे.

डॉक्टरांचा सल्ला

  • पालकांनी लहान मुलांना दुचाकीवरून नेणे टाळावे.
  • लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाताना मास्कचा वापर करावा.
  • जंक फूड, फास्ट फूड यांचे सेवन कमी करा. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
  • रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचे दमा आणि न्यूमोनिया या विकारांत रूपांतर होते.
  • प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज.

शहरातील प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. तसेच शहरातील हवेच्या गुणवत्तेची माहिती ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात येते. जर शहरातील बालकांच्या आरोग्यावर परिणाम होत असेल तर हा संशोधनाचा विषय आहे.    – डी. बी. पाटील,  प्रादेशिक अधिकारी, कल्याण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ