News Flash

प्रदूषणामुळे श्वास घुसमटला!

शहरातील ढासळत चाललेल्या पर्यावरणाविषयी मात्र कुणीही ‘ब्र’ काढत नाही.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सध्या ‘स्मार्ट सिटी’, ‘ग्रोथ सेंटर’, शहराचा कायापालट अशा विविध आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. पण शहरातील ढासळत चाललेल्या पर्यावरणाविषयी मात्र कुणीही ‘ब्र’ काढत नाही. महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये आता कल्याण-डोंबिवलीची गणना होऊ लागली असून नुकताच येथे प्रदूषणाचा ‘हिरवा पाऊस’ही पडून गेल्याने येथील नागरिक चिंताक्रांत

बनले आहेत.

कल्याण-डोंबिवलीत प्रदूषणकारी कारखाने, सुरू असलेली विकासकामे आणि वाहतूक कोंडीमुळे मोठय़ा प्रमाणावर होणारे प्रदूषण यामुळे येथील रहिवाशांचा श्वास अक्षरश: कोंडू लागला आहे. राज्य शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्ष यांच्या दुर्लक्षामुळे प्रदूषणाचे हे प्रमाण वाढू लागले आहे.

रहिवासी गुरफटले धूर, धुळीत

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या वर्षभरामध्ये शहरातील ७ ठिकाणच्या हवेची तपासणी केली. त्यातून वायुप्रदूषणाची तीव्रता लक्षात येत असून हवेतील अनावश्यक घटकांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. शहरातील वायुप्रदूषणाची तपासणी करत असताना प्रामुख्याने धुलिकणांचे प्रमाण तपासले जाते. हवेतील धुलिकणांचे प्रमाणे नॅशनल अँबियंट एअर क्वॉलिटी स्टॅंडर्ड (एनएएक्यूएस)ने आखून दिलेल्या वार्षिक सरासरी ६० पर्यंत असणे योग्य मानले जाते. कल्याण-डोंबिवलीमध्ये हे प्रमाण दुप्पट असल्याचे पर्यावरण नियंत्रण विभागाच्या नोंदीवरून दिसून येते.

ध्वनिप्रदूषणाचा आवाज मोठा

कल्याण-डोंबिवलीत जल, वायू, भूमी प्रदूषणाबरोबरच ध्वनिप्रदूषणाचे प्रमाणही मोठे आहे. आवाजाची कमाल मर्यादा ओलांडून नुसता गजबजाट शहरात असून दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळा आवाजाच्या कमाल मर्यादा ओलांडल्याचे दिसून येते. चिडचिडेपण, उच्च रक्तदाब, मानसिक तणाव, निद्रानाश आणि कायमचा बहिरेपणा इतके भयंकर आजार ध्वनिप्रदूषणामुळे होत असून शहरातील हा आवाज पाहता या आजारांचे प्रमाण वाढीला लागण्यास मदत होत आहे. पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने याविरुद्ध कारवाईच होत नसल्याचे यातून स्पष्ट होत आहेत.

उपाययोजना म्हणजे मलमपट्टी

शहरातील ध्वनिप्रदूषण थांबवण्यासाठी महापालिकेच्या वतीने काही उपाययोजना केल्या असल्या तरी या उपाययोजना म्हणजे केवळ मलमपट्टी ठरलेली आहे. महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेसमध्ये प्रेशर हॉर्न बसवण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र हजारो वाहने असलेल्या या शहरात केवळ दीडशे बसेस बसवणे म्हणजे मलमपट्टी ठरली आहे. याशिवाय उत्सवांच्या काळात मोठय़ा आवाजातील वाद्यांवर र्निबध आणले असले तरी हे र्निबध तोडून उत्सवांमधील दणदणाट सुरू असतो. मात्र अशांवर कारवाईच केली जात नाही.

शांतता क्षेत्रांची अंमलबजावणी नाही

कल्याण-डोंबिवली शहरामध्ये मोठय़ा प्रमाणात शांतता क्षेत्रे असली तरी त्याची अंमलबजावणी मात्र झालेली दिसून येत नाही. शहरामध्ये १ एप्रिल २०१२ पासून ८३३ शांतता क्षेत्रांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ७५ महापालिका शाळा, ५०० खाजगी शाळा, १२ महाविद्यालये, ११८ रुग्णालये, डोंबिवलीतील ११३ रुग्णालये आणि ५ महापालिका शाळांचा समावेश आहे. मात्र घोषित झालेल्या या शांतता क्षेत्रांना महासभेतील नगरसेवकांनी स्थगिती देऊन कारवाई थांबवण्यास भाग पाडले आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 12:19 am

Web Title: air pollution create breathing problem
Next Stories
1 भाजपमध्ये यावे, पावन व्हावे!
2 होपला अत्यल्प प्रतिसाद
3 जनता ‘स्मार्ट’ झाली पाहिजे!
Just Now!
X