दैनंदिन अहवालात धोकादायक पातळीची नोंद; पालिकेचे हातावर हात

ठाणे महापालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या पर्यावरण अहवालामधून शहरातील महत्त्वाच्या चौकांतील हवा प्रदूषित असल्याचे वास्तव पुढे आले असतानाही हे प्रदूषण कमी व्हावे यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना राबविण्यात आल्या नसल्याचे स्पष्ट होत आहे. ठाणे महापालिकेने शहरातील प्रमुख चौकांमध्ये हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी यंत्रणा उभारली आहे. त्यातील दैनंदिन मापनातून या चौकांमधील प्रदूषणाची पातळी धोकादायक स्थितीपर्यंत पोहचल्याचे स्पष्ट होत आहे. तरीही उपकरणे बसविण्यापलीकडे प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस काही होत नसल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे.

ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडून शहरातील हवेचे निरीक्षण आणि मापन करण्यात येते. त्यासाठी शहरातील तीन हात नाका, कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती कार्यालय परिसर या रहिवासी क्षेत्रात, तर रेप्टाकोस कंपनी या औद्योगिक क्षेत्रात हवा गुणवत्ता मापन उपकरणे बसविण्यात आली आहेत.

या प्रदूषकांत सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, फोटोकेमिकल ऑक्सिडन्ट, धुळीकण, बेन्झीन तसेच शिसे, आर्सेनिक, निकेल यासारख्या जड धातूंचा समावेश असतो. प्रदूषण नियंत्रण विभागाकडून त्याचे निरीक्षण आणि मापन करण्यात येत असून त्याची सविस्तर माहिती दरवर्षी पर्यावरण अहवालातून दिली जाते.

नुकत्याच जाहीर झालेल्या पर्यावरण अहवालामध्ये शहरातील चौकांमध्ये हवा प्रदूषित असल्याचे उघड झाले होते. त्यानंतरही कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे दैनंदिन प्रदूषण मापनामुळे पुन्हा स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांच्याशी संपर्क साधला असता, वायुप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना आखण्याचे काम सुरू असून त्या लवकरच जाहीर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

प्रदूषण अधिक असलेले चौक

तीन हात नाका, कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती कार्यालय परिसर या रहिवासी क्षेत्रातील आणि रेप्टाकोस कंपनी या औद्योगिक क्षेत्रातील हवा अतिप्रदूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे शहरातील या चार चौकांमध्ये २ जानेवारीला झालेली नोंद पाहता हवा अत्यंत प्रदूषित असल्याचे दिसते. या  ठिकाणी हवेचा प्रदूषण निर्देशांक ९७ टक्के आहे.