ठाण्यात हवा गुणवत्ता निर्देशांक ५० टक्क्यांवरून ३७ टक्क्यांवर

नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीच्या काळात ठाणे शहरामधील प्रदूषणात घट झाली होती.  टाळेबंदी शिथिलीकरणानंतर हवा प्रदूषणात पुन्हा वाढ  होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र महिनाभरापूर्वी उठवलेल्या टाळेबंदीनंतरही शहरातील हवा गुणवत्ता आणखी सुधारल्याची बाब समोर आली आहे. यापूर्वी १०० टक्क्यांपेक्षा जास्त असलेला हवा गुणवत्तेचा निर्देशांक टाळेबंदीच्या काळात ५० टक्क्यांवर आला होता. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर मोठी घट झाली असून तो आता ३७ टक्क्यांवर आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यामुळे हवा प्रदूषित होत असल्याची बाब सातत्याने समोर येत आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ मार्चपासून देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे सर्वच रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली होती. ठाणे शहरातील तीन हात नाका, कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती कार्यालय परिसर या रहिवासी क्षेत्रात, तर रेप्टाकोस कंपनी या औद्योगिक क्षेत्रात बसविण्यात आलेल्या हवा गुणवत्ता मापन उपकरणांद्वारे शहरातील हवेचे मापन आणि निरीक्षण होते. या अहवालाद्वारे ही माहिती पुढे आली होती.  टाळेबंदी शिथिलीकरणानंतर शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ पुन्हा सुरू झाली. मात्र टाळेबंदी शिथिलीकरणानंतर हवा प्रदूषित होण्याऐवजी त्यामध्ये उलट सुधारणा झाल्याची बाब समोर आली आहे.

शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक

ठिकाण                                 प्रदूषण निर्देशांक

टाळेबंदीपूर्वी      टाळेबंदीत       शिथिलीकरणानंतर

तीन हात नाका    १५२ %                 ४६ %                  ४५ %

नौपाडा प्रभाग     ९२ %                    ५२ %                   ३५ %

कोपरी प्रभाग     ७६ %                       ५६ %                 ४० %

रेप्टाकोस कंपनी ८३ %                    ४७ %                   ३० %

 

हवेची गुणवत्ता               मर्यादा

चांगली                       ० ते २५%

मध्यम                       २६ ते ५० %

प्रदूषित                        ५१ ते ७५ %

अत्यंत प्रदूषित   ७५% पेक्षा जास्त

 

ठाण्यात दरवर्षी पावसाळ्यामध्ये हवा गुणवत्तेत काही प्रमाणात सुधारणा होते. मात्र, त्यानंतरही शहरातील हवा प्रदूषित पातळीतच असायची. यंदा मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेली टाळेबंदी शिथिल केल्यानंतरही शहरात पूर्वीप्रमाणे वाहनांची वर्दळ सुरू झालेली नसून त्यातच सतत पाऊस सुरू आहे. तसेच बांधकामे आणि हॉटेल बंद आहेत.

– मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, ठाणे महापालिका