भरगच्च वेळापत्रकातून १४ फेब्रुवारीला वगळले
अखिल भारतीय नाटय़संमेलनाची धामधूम शुक्रवारपासून ठाण्यात सुरू होत असून या संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर ठाणेकरांना विविध कार्यक्रमांची मेजवानी लाभणार आहे. नाटय़संमेलनानिमित्त ठाणे शहरात सुमारे दहा दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. १२ ते २१ फेब्रुवारीदरम्यान रंगणारा हा महोत्सव आजवरच्या नाटय़संमेलनाच्या इतिहासातील सर्वात भव्यदिव्य महोत्सव असेल, असा आयोजकांचा दावा आहे. असे असले तरी या महोत्सवाच्या तारखांदरम्यान येणाऱ्या १४ फेब्रुवारी अर्थात ‘व्हॅलेन्टाइन डे’च्या दिवशी मात्र संमेलनाचा कोणताही कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे नाटय़संमेलने ‘व्हॅलेन्टाइन’ सुट्टी घेतल्याची चर्चा सध्या नाटय़वर्तुळात निर्माण झाली आहे. नाटय़संमेलनाच्या कार्यक्रम घोषणेच्या पत्रकार परिषदेमध्येही या विषयी प्रश्न निर्माण करण्यात आला. मात्र या दिवशी नाटय़गृहातील सगळ्या तारखांची अगोदरच नोंदणी झाली असल्याने हा दिवस कार्यक्रम पत्रिकेतून वगळण्यात आल्याचे या वेळी संयोजकांनी स्पष्ट केले आहे.
नाटय़संमेलन हा नाटय़रसिक आणि नाटय़कलाकारांसाठी वार्षिकोत्सव असून ९६ व्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने ठाण्यातील महत्त्वाच्या आठ ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलन घोषित होण्यापूर्वी अनेक निर्माते मंडळींनी शहरातील नाटय़गृहांमध्ये नाटकांचे आरक्षण केले होते. नाटय़संमेलनाची घोषणा झाल्यानंतर या नाटकांचे प्रयोग रद्द करून त्या ठिकाणी नाटय़संमेलनाच्या कार्यक्रमांची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसल्याने नाटय़निर्माते आणि संयोजक यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. संमेलनाच्या दरम्यान येणारा रविवार हा नाटय़कलाकारांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत असून गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहातील सगळे प्रयोग आरक्षित आहेत. हे प्रयोग सोडण्यास नाटय़ निर्मात्यांनी नकार दिल्याने १४ फेब्रुवारी हा दिवस निर्मात्यांना देण्यात आला आहे, असे नियोजन समिती सूत्रांकडून कळते.
हा सगळा नाटय़संमेलनाचा पसारा नाटकांसाठीच असून त्यासाठीच हे वेगळे नियोजन राखल्याचे नाटय़परिषदेचे निमंत्रक नरेंद्र बेडेकर यांनी सांगितले. शिवाय मुख्य शाखेने दिलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार ही कार्यक्रमांची रचना केली असून त्यांनी दिलेल्या निकषांवरच हे संमेलन होणार आहे, असे नाटय़ परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष राजन विचारे यांनी सांगितले.