ढोल-ताशा पथकांचा गगनभेदी गजर, बॅण्ड पथकांची मानवंदना, आदिवासी आणि कातकरी समाजातील लोकनृत्य, ठाणेकरांनी सादर केलेले नाटय़प्रवेश आणि नाटय़सृष्टीतील मान्यवर कलाकारांची उपस्थिती यामुळे साहित्य संमेलनाची नाटय़दिंडी लक्षवेधी ठरली. नाटय़संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या उपस्थितीत लेखक श्याम फडके यांच्या ब्राह्मण सोसायटी येथील घरापासून ही दिंडी निघाली. शहरातील शैक्षणिक, सामाजिक, नाटय़संस्था आणि नाटय़चळवळीतील मंडळींनी सुमारे २०हून अधिक चित्ररथ या महोत्सवात साकारले होते. त्यामुळे एकूण संमेलनाचा दिमाखदार सोहळा संपूर्ण ठाणेकरांसाठी नयनरम्य ठरला.
माजी अध्यक्षा फय्याज शेख, अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या मुख्य शाखेचे अध्यक्ष मोहन जोशी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, नाटय़ परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष राजन विचारे यांच्यासह महाराष्ट्रातील ज्येष्ठ रंगकर्मी आणि मान्यवर उपस्थित होते. ठाण्यातील नौपाडा येथील ब्राह्मण सोसायटी येथील लेखक श्याम फडके यांच्या घरातून निघालेल्या दिंडीत पालखीचा समावेश करण्यात आला होता. ब्राह्मण सोसायटीतून निघालेली दिंडी गोखले रस्त्यावर येईपर्यंत त्याचे रूपांतर विस्तृत शोभायात्रेमध्ये झाले होते. त्यामध्ये सातशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. तर दहा मोठय़ा ट्रकमध्ये वेगवेगळे चित्ररथ साकारण्यात आले होते. नाटय़संमेलनानिमित्ताने आयोजित उत्सवी दिंडीमध्ये शहरातील शंभूराजे, स्वयंभू संस्कृती, चार मोठे ढोल पथक सहभागी झाले होते. याबरोबरच ब्राह्मण शिक्षण मंडळ, शिवसमर्थ शाळा, गॉर्डिन स्कूल, सरस्वती शिक्षण मंडळ आणि क्रीडा संकुल, भगवती विद्यामंदिर, ठाणे शिक्षण मंडळाच्या शाळा, बेडेकर विद्यामंदिर, श्रीरंग विद्यामंदिर, डीएसव्ही सीबीएससी स्कूल यासारख्या शैक्षणिक संस्थांनी सहभाग नोंदवला होता. याशिवाय काही निर्मात्यांनी आपल्या नाटकांचे चित्ररथ यात सहभागी केले होते. युनायटेड स्पोर्टस क्लब, स्काऊड गाइडचे विद्यार्थी, अभिनय कट्टा, नाटय़संमेलनाचा चित्ररथ, कोळी बांधवांचा सहभाग, हे या शोभायात्रेचे वैशिष्टय़े होती.

कलाकारांची मांदियाळी..
ऋजुता देशमुख, मंगेश देसाई, संपदा जोगळेकर, उदय सबनीस, सुशांत शेलार, सुकन्या कुलकर्णी, लता नार्वेकर, अशोक समेळ, विजू माने, राजन ताम्हाणे, विनय येडेकर आदी कलाकार दिंडीत उपस्थित होते.