साहित्य संमेलन समारोपप्रसंगी महामंडळाचा ठराव; संमेलनाध्यक्षांचे मौनच

पुण्यातील संभाजी उद्यानात असलेला भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडून टाकल्याच्या घटनेचे साहित्यिक व सांस्कृतिक वर्तुळात तीव्र पडसाद उमटले असताना, रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यातील खुल्या अधिवेशनात त्या घटनेचा बेताबेताने निषेध करण्यात आला. संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी त्यांच्या भाषणात तर या घटनेचा उल्लेखही केला नाही!

राम गणेश गडकरी यांनी संभाजी महाराजांचा त्यांच्या साहित्यातून अपमान केला, असा आरोप करीत पुण्यातील गडकरी यांचा पुतळा उखडण्यात आला होता. हे कृत्य आम्हीच केले, असे सांगणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांना त्या प्रकरणी अटकही झाली होती. डोंबिवली येथे शुक्रवारी सुरू झालेल्या व रविवारी समारोप झालेल्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या तोडफोडीचा निषेध केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. संमेलनाच्या समारोपाचेवेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे खुले अधिवेशन होते. त्यात त्याबाबतचा निसंदिग्ध ठराव येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. या खुल्या अधिवेशनात एकूण ३१ ठराव मांडण्यात आले. त्यातील एक पुतळ्याच्या तोडफोडीबाबतचा होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी हे त्याचे सूचक, तर प्रकाश पायगुडे हे त्याचे अनुमोदक होते. मात्र या ठरावात संभाजी ब्रिगेडचा थेट उल्लेख करण्यात आलेला नाही. काही विशिष्ट संस्था व संघटना समाजात सांस्कृतिक व सामाजिकदृष्टय़ा आदराचे स्थान असणाऱ्या प्रतिकांची मोडतोड करीत असून, त्या कृतींमध्ये या नव्या कृतीची भर पडली असून, संमेलन अशा कृत्यांचा तीव्र निषेध करत आहे, असे सांगणारा हा ठराव आहे. शिवाय, अशा कृत्यांना आळा घालण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असून अशा प्रवृत्तींचा, व्यक्तींचा शोध घेऊन शासनाने त्यांचा कायदेशीर बंदोबस्त त्वरित करावा, अशी मागणीही त्या ठरावात करण्यात आली आहे. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंदराव पानसरे व डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येमागील सूत्रधारांना शिक्षा होण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी सूचना करणारा ठरावही संमेलनात मांडण्यात आला.