17 January 2019

News Flash

माहितीच्या महाजालात मराठीचा झेंडा रोवा..!

सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांचे मराठी भाषकांना आवाहन

सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांचे मराठी भाषकांना आवाहन

जगाच्या कानाकोपऱ्यातील अन्य भाषांबरोबर मराठीचे अस्तित्व ताठपणे दिसले पाहिजे. त्यासाठी संगणक आणि माहितीच्या महाजालात मराठीचा वापर वाढला पाहिजे. त्यामुळे मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने विकिपीडियावर मराठीतून एक पान लिहावे. अशी लाखो पाने विकिपीडियावर झळकवून मायमराठीचा झेंडा अटकेपार न्यावा, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी येथे केले.

त्याचबरोबर कोणतीही कला असो ती राजाश्रित असता कामा नये, तर ती राजपुरस्कृत असली पाहिजे आणि त्याच पद्धतीने साहित्य संमेलन, मराठी भाषक व्यवहार, संस्कृतीविषयक कार्यक्रमांना राजपुरस्कृत करणे हे आम्ही शासन म्हणून आमचे कर्तव्य समजतो, असे ते पुढे म्हणाले.

डोंबिवलीतील ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात तावडे बोलत होते. या वेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी, संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, स्वागताध्यक्ष गुलाब वझे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर, अतिरिक्त आयुक्त संजय घरत, लेखक सुरेश देशपांडे उपस्थित होते.

मराठीला युनिकोडच्या माध्यमातून गुगल, याहू, सॅप, ओरॅकलमध्ये स्थान मिळाले आहे. हे स्थान कायम टिकविण्यासाठी शासन तितक्याच ताकदीने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना साथ म्हणून राज्यातील प्रत्येक व्यक्तीने मराठी भाषादिनी विकिपीडियावर मराठीतून एक पान लिहून ते झळकवावे, असे आवाहन तावडे यांनी केले.

संमेलनात जेवढे ठराव मांडण्यात आले आहेत त्या ठरावांवर मार्चनंतरच्या विधिमंडळ अधिवेशनानंतर सर्व साहित्य महामंडळ पदाधिकारी, संमेलन संयोजक, राजकीय नेते, मंत्री यांची एकत्रित बैठक घेण्यात येईल. या बैठकीत शासन योग्य तो विचार आणि निर्णय घेईल. संमेलनाध्यक्षांनी वर्षभर राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन तेथील मराठी वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधावा. भाषा, साहित्य वाढीसाठी प्रयत्न करावेत, यासाठी जे सहकार्य लागेल ते शासन देईल, असे तावडे म्हणाले. गेल्या वर्षी पुस्तकाच्या गावाची घोषणा करण्यात आली होती. हे गाव वाईजवळ भिलार येथे उभे करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून येत्या काही महिन्यांत ते प्रत्यक्षात सुरू होईल, असेही ते म्हणाले.

मराठीतील उत्तम साहित्य भारतीय प्रादेशिक भाषांत, तसेच परकीय भाषांमध्ये जाण्यासाठी आणि अन्य भाषांमधील उत्तम साहित्य मराठी भाषेत आणण्यासाठी महामंडळाच्या मदतीने प्रयत्न करेल, असे तावडे यांनी सांगितले.

 

‘समाजाने विस्थापितांचेही म्हणणे ऐकावे’

प्रसाद हावळे : तंत्रज्ञानाकडे वळताना त्यातले काय घ्यायचे आणि काय नाही याचा विवेक असावा लागतो. तो बाळगणाऱ्यांना मात्र विकासविरोधी, राष्ट्रविरोधी म्हणून हिणवले जाते. तरीही प्रस्थापितांविरोधातील विस्थापितांचा लढा सुरू आहे; देशाच्या नियोजनात आदिवासींच्या विकासासाठी अवकाश मिळतच नाही. त्यामुळे साहित्य संमेलनात जसा समाज एकवटतो, साहित्यिकांचे ऐकतो, तसेच त्यांनी विस्थापितांच्या लढय़ाचेही ऐकावे, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी केले. डोंबिवली येथील पु. भा. भावे साहित्यनगरीत रविवारी पार पडलेल्या ‘प्रतिभायन’ या विशेष संवादसत्रात त्या बोलत होत्या.

 

ढसाळांच्या कवितांमधील शिव्या हा संतापाचा उद्रेक – डॉ. हृषीकेश कांबळे यांचे मत

डोंबिवली : नामदेव ढसाळांच्या कवितांमध्ये शिव्या येणे स्वाभाविकच आहे. कारण हा त्यांच्या संतापाचा उद्रेक होता, असे मत साहित्यिक डॉ. हृषीकेश कांबळे यांनी व्यक्त केले. ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘विविध साहित्य प्रवाहांची सद्य:स्थिती’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.

ढसाळांच्या कवितांमध्ये येणारी प्रत्येक शिवी ही संस्कृतिसंचित होती. त्यांच्या प्रत्येक शिवीमध्ये  व्यवस्थेविषयी उद्रेक होता. मात्र गेल्या १० वर्षांत दलित साहित्यांत कुणीही उठून व्यवस्थेला शिव्या देत होते. त्या शिव्यांमध्ये कार्यकारणभाव नव्हता, असेही कांबळे म्हणाले. दलित साहित्य हे जगाच्या पाठीवर पोहोचले आहे. दलित साहित्यात तुलनेने कथा आणि कादंबऱ्या कमी लिहिल्या गेल्या असल्या तरी भविष्यात हे प्रमाण वाढेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

 

सहाव्या इयत्तेत संपादित पुस्तक!

डोंबिवली : बाल साहित्यात फारसे दर्जेदार लिखाण होत नाही, अशी ओरड होत असतानाच बुलढाणा येथील मैत्री लांजेवार हिने संपादित केलेल्या ‘बालसाहित्य आकलन आणि परिचय’ या पुस्तकाचे प्रकाशन बालकुमार मेळाव्यात डॉ. न. म. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनात एका लहान मुलीने संपादित केलेले पुस्तक प्रकाशित होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. या मुलांमुळे बालसाहित्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असे गौरवोद्गार यावेळी जोशी यांनी काढले.

First Published on February 6, 2017 1:47 am

Web Title: akhil bharatiya marathi sahitya sammelan 2017 4