‘मराठी ज्ञानभाषा व्हावी’ अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केलेली असतानाच येथील ‘ग्रंथग्राम’मधील पुस्तकांच्या काही स्टॉल्सवरही त्या दिशेने प्रयत्न होत असल्याचे दिसले. काही मराठी प्रकाशक आणि पुस्तक विक्रेत्यांनी ‘डिजिटल’ झेप घ्यायला सुरुवात केली आहे.

प्रकाशकांचे ‘मराठी रीडर’ अ‍ॅप

मराठीतील सहा प्रकाशकांनी एकत्र येऊन ‘मराठी रीडर’ हे ‘ई बुक अ‍ॅप’ तयार केले आहे. त्याचा स्टॉल ग्रंथग्राममध्ये आहे. या अ‍ॅपवर पॉप्युलर, राजहंस, रोहन, ज्योत्स्ना, मौज, कॉन्टिनेंटल असे सहा प्रकाशक आहेत. सध्या या अ‍ॅपवर सहभागी सहा प्रकाशकांची पुस्तके उपलब्ध असून अन्य मराठी प्रकाशकांनीही यात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा ‘रोहन प्रकाशन’चे रोहन चंपानेरकर यांनी व्यक्त केली.

आमचे हे अ‍ॅप ‘गुगल’ अ‍ॅप स्टोअरवर मोफत उपलब्ध असून आत्तापर्यंत आठशेहून अधिक लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे. सध्या या अ‍ॅपवर आमच्या सहा प्रकाशकांची पुस्तके उपलब्ध आहेत. मराठी पुस्तके सहजपणे जास्तीतजास्त वाचकांपर्यंत विशेषत: नव्या पिढीपर्यंत पोहोचवावीत हा यामागचा आमचा उद्देश असल्याचे सांगून चंपानेरकर म्हणाले, पुस्तकाच्या छापील किमतीपेक्षा पन्नास टक्के सवलतीत या अ‍ॅपवरून पुस्तक खरेदी करता येणार आहे. अ‍ॅड्रॉइड आणि विंडोजप्रणाली असलेल्या स्मार्ट मोबाइलवर ही पुस्तके वाचकांना पाहायला व वाचायला मिळणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपवर मराठी पुस्तके

ई साहित्य प्रतिष्ठानचे सुनील सामंत म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून आम्ही या क्षेत्रात काम करत असून त्याला वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत आम्ही एक हजारांहून अधिक पुस्तके ई-बुक स्वरूपात तयार केली आहेत. साहित्यप्रेमी वाचकांनी आपला मेल आयडी आम्हाला पाठवला तर आमची ई-बुक आम्ही त्यांना विनामूल्य पाठवतो. पुढचे पाऊल म्हणून आम्ही आता ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर पुस्तक हा उपक्रम सुरू केला आहे. त्या उपक्रमाअंतर्गत ७७१०९८०८४१ या दूरध्वनी क्रमांकावर वाचकांनी त्यांचे नाव व कुठे राहतो ते फक्त कळवायचे आहे. याची नोंद आमच्याकडे झाली की एक मराठी पुस्तक त्यांना पाठविले जाणार आहे. सध्या साने गुरुजी यांचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक उपलब्ध आहे.

 ‘ग्रंथग्राम’मध्ये दुपारनंतर गर्दी

साहित्य संमेलनाच्या ‘ग्रंथग्राम’चे उद्घाटन शुक्रवारी झाले. पण शुक्रवारी ‘ग्रंथग्राम’मध्ये फारशी गर्दी नव्हती. शनिवारी दुपारपासून मात्र ग्रंथग्राममध्ये वाचक, साहित्यप्रेमी यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. शनिवारी संध्याकाळनंतर आणि रविवारी दिवसभर येथे मोठय़ा प्रमाणात गर्दी होईल, असा विश्वास प्रकाशकांकडून व्यक्त करण्यात आला. शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन ग्रंथग्राममधील पुस्तकांच्या स्टॉल्सना भेट देत आहेत, हे एक आगळे वैशिष्टय़ या वेळी पाहायला मिळाले, असे ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलापूरकर यांनी सांगितले.