‘युद्धस्य कथा’ परिसंवादातील सूर

प्रत्येक भारतीयाच्या नसानसात देशप्रेम भरलेले असून प्रत्येक पालकाने आपल्या एकातरी पाल्याला सैन्यात, पोलीस दलात पाठवावे आणि तो गणवेश त्याच्या अंगावर चढवावा. एकूणच देशात ‘सामरिक’ संस्कृती वाढविण्याची आवश्यकता आहे, असा सूर ‘युद्धस्य कथा’ या परिसंवादात व्यक्त झाला.

परिसंवादात निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, कर्नल अभय पटवर्धन, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील सहभागी झाले होते. परिसंवादाचे सूत्रसंचालन अनुराधा प्रभुदेसाई यांनी केले.

१९७१ चे युद्ध, कारगिल युद्ध, ऑपरेशन ब्ल्यू स्टार, ‘२६/११’चा दहशतवादी हल्ला याच्या आठवणी आणि काही थरारक अनुभव सहभागी वक्त्यांनी सांगितले. गोखले यांनी सैन्याला संरक्षण सेना/दल असे न म्हणता सशस्त्र सेना/दल म्हणावे, असे सुचविले. ‘जे जे वर जाते ते ते जमिनीवर येते. म्हणून आपले पाय जमिनीवर राहिले पाहिजेत, असा गुरुमंत्र माझ्या गुरूंकडून मिळाला असल्याचेही ते म्हणाले. कर्नल पटवर्धन यांनी ‘जो प्रथम मारा करतो तो जिंकतो. दुसऱ्यांदा करतो तो हरतो’ असे सैन्यदल व पोलिसांचे ब्रीदवाक्य असल्याचे सांगितले. विश्वास नांगरे-पाटील यांनी आपण गणेशोत्सवातील बंद केलेले ३० हजार डिजे, निर्भया पथक या उपक्रमांविषयी माहिती दिली.

युद्धात वीरमरण आलेला सैनिक शत्रू राष्ट्राचा असला तरी एक योद्धा होता, हा विचार केला जातो. त्याच्या मरणानंतर एक सैनिक म्हणून त्या पार्थिवावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले जातात. भारतीय सैन्यदल शत्रुराष्ट्राच्या सैनिकाबाबत असा सन्मान दाखविते, असे मत सैन्यदलातील या तिन्ही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

‘दंडुक्यापेक्षा घरच्या लाटण्याची भीती’

छेडछाड करणाऱ्यांविरोधात आम्ही कारवाई सुरू केली. जे विवाहित होते त्यांना त्यांच्या पत्नीसह तर जे विद्यार्थी होते त्यांना त्यांच्या पालकांसह पोलीस ठाण्यात बोलाविले. त्यांच्या कृत्याचा पाढा घरच्यांसमोर वाचून दाखविण्यात आला. पोलिसांच्या दंडुक्यापेक्षा घरच्या लाटण्याच्या प्रसादाची भीती जास्त वाटत असावी, असे नांगरे-पाटील यांनी सांगताच सभागृहात हशा उसळला.