बालकुमार मेळाव्यातील वक्त्यांचे मत 

इतर साहित्यप्रकारांच्या तुलनेत बालवाङ्मयाच्या निर्मितीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या वाङ्मय प्रकारात तुलनेने सकस साहित्यनिर्मिती झाली नाही. खरेतर सध्याच्या काळातील मुलांच्या भावविश्वाशी नाते सांगणारे साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे. सध्या उपलब्ध असलेल्या दृक्श्राव्य माध्यमाद्वारे अशा प्रकारचे साहित्य जास्तीतजास्त मुलांपर्यंत पोहोचविले पाहिजे, असे मत संमेलनातील बालकुमार मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी मांडले. डॉ. न. म. जोशी यांनी अध्यक्षपद भूषविले.

ग्रंथपाल नरेंद्र लांजेवार, एकनाथ आव्हाड, सुरेश सावंत यांनीही या मेळाव्यात मते मांडली. बाल साहित्य ही व्यक्तीच्या वाचनाची सुरुवात असते. त्यामुळे अधिक डोळसपणे या क्षेत्रात वाङ्मयनिर्मिती होणे गरजेचे आहे. कारण त्यातून भावी वाचक तयार होत असतात. त्यामुळे या वाङ्मय शाखेकडे अधिक गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता परिसंवादात व्यक्त केली गेली. मुलांसाठी लिहिणाऱ्या लेखकांनी आधी आपण ज्या वयोगटातील मुलांसाठी लिहितोय त्यांच्याशी संवाद साधावा. प्रसंगी त्यांना आपले लेखन दाखवून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्याव्यात, असेही मत वक्त्यांनी   मांडले.