सेनेतील संघनिष्ठांना आपलेसे करण्याचा भाजपचा प्रयत्न

जयेश सामंत/ नीलेश पानमंद, ठाणे</strong>

भाजपला वाकुल्या दाखवीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा करणाऱ्या शिवसेना नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (अभाविप) मात्र सहकार्याचा हात कायम ठेवला आहे.

विद्यार्थी परिषदेच्या कोकण प्रांताचे ५४ वे अधिवेशन २७ डिसेंबरपासून ठाण्यात भरविण्यात येत असून या अधिवेशनासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वागत समितीत प्रमुख संरक्षक म्हणून गृहमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेना नेत्यांनी पुढाकार घेतला आहे.

अधिवेशनाच्या आयोजनासाठी आवश्यक असलेली ‘रसद’ पुरविणाऱ्यांचा उल्लेख ‘संरक्षक’ असा करण्याचा ‘अभाविप’मध्ये प्रघात मानला जातो. त्यामुळे हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी शिवसेना नेत्यांनी दाखविलेल्या ‘दानशूर’पणाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या ‘अभाविप’ची स्थापना १९४९ मध्ये झाली असून ही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेली देशव्यापी संघटना आहे. या परिषदेच्या कोकण प्रांताचे ५४ वे अधिवेशन येत्या २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात होत आहे. कोकण प्रांताच्या २५ जिल्ह्य़ांतून सुमारे ७०० विद्यार्थी या अधिवेशनात सहभागी होणार असून हे अधिवेशन यशस्वी व्हावे यासाठी विद्यार्थी परिषदेतून कार्यरत राहिलेले भाजपचे अनेक नेते गेल्या काही दिवसांपासून परिश्रम घेत आहेत. २७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता शिलाहार प्रदर्शनाचे उद्घाटन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार असून मुख्य अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना पाचारण करण्यात आले आहे.

ठाणे, डोंबिवलीतील एकगठ्ठा मतांची बेगमी

राज्यात आणि केंद्रात एके काळी मित्रपक्ष राहिलेल्या भाजपची पालकसंस्था असलेल्या संघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेना नेत्यांनी प्रयत्नपूर्वक सौहार्दाचे संबंध राहतील असे प्रयत्न ठाणे जिल्ह्य़ात अनेक वर्षे केले आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवली या पट्टय़ात संघनिष्ठांची प्रभावी अशी मते राहिली असून यामुळे संघाच्या शाखांना भेटी देणे, त्यांच्या कार्यक्रमांना वेगवेगळ्या मार्गानी सहकार्य करणे अशी कामे शिवसेना नेत्यांकडून यापूर्वीही झाली आहेत. राज्यात नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये टोकाचा विसंवाद निर्माण झाला असला तरी संघनिष्ठांना दुखवायचे नाही असाच प्रयत्न शिवसेना नेत्यांनी सुरू केल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनासाठी आवश्यक ती ‘रसद’ पुरविण्यात शिवसेना नेते अग्रस्थानी राहिल्याचे दिसते.

* ‘अभाविप’ने अधिवेशनाचे ‘संरक्षक’ म्हणून गृहमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, ओवळा माजिवडा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा आवर्जून उल्लेख केला आहे.

* याशिवाय, भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, डॉ. विवेक वडके, अरविंद जोशी आणि संदीप लेले यांचीही नावे निमंत्रण पत्रिकेत ‘संरक्षक’ म्हणून आहेत.

* अधिवेशन यशस्वी व्हावे यासाठी ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी घेतलेला पुढाकार येथील राजकीय वर्तुळात कमालीचा चर्चेचा विषय ठरला आहे. येथील संघनिष्ठांशी जवळीक कायम ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचे शिवसेनेच्या वर्तुळात बोलले जात आहे.

* विद्यार्थी परिषदेच्या म्हणण्यानुसार ‘संरक्षक’ या शब्दाचा अर्थ यजमानाच्या मानसिकतेतून अधिवेशन आपल्या शहरात आहे याची जाणीव ठेवून सहकार्य करण्याची भूमिका करणारी व्यक्ती अथवा समूह.

अभाविपचे हे ठाण्यातील तिसरे अधिवेशन आहे. यापूर्वी १९९० आणि १९९५ मध्ये झालेल्या अधिवेशनाला शिवसेनेचे स्वर्गीय नेते आनंद दिघे यांनी सहकार्य केले होते. दिघे आणि परिषदेचे एक वेगळेच नाते होते. शिवसेनेच्या विद्यमान नेत्यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाला केलेले सहकार्य हे आनंद दिघे यांच्या समर्थ वारशाचे द्योतक म्हणावे लागेल. रचनात्मक कामाला होणारे सहकार्य राजकीय चौकटीत बसविण्याचा प्रयत्न चुकीचा ठरेल.

– मकरंद मुळे, माजी शहर प्रमुख अभाविप, ठाणे

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेली संघटना आहे. ठाण्याचा विद्यमान महापौर आणि यापूर्वी विद्यार्थी चळवळीत काम केल्यामुळे मला या कार्यक्रमाला आयोजकांनी उद्घाटक म्हणून बोलाविले असावे. ही विद्यार्थ्यांची संघटना असल्यामुळे त्याचा राजकीय अर्थ काढणे योग्य ठरणार नाही.    – नरेश म्हस्के,महापौर, ठाणे