गेला आठवडाभर ठाणेकरांनी नाटय़ दिवाळी अनुभवली, नाटय़ संमेलनानिमित्त आयोजित केलेल्या पूर्वरंग कार्यक्रमाची मेजवानी ठाणेकरांना मिळाली. मुख्य नाटय़ संमेलनालाही दर्दी ठाणेकरांनी गर्दी करून आपली पसंती दर्शविली. संमेलनाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. संमेलनाचे स्वागताध्यक्षपदाचा मान जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना मिळाला, त्यामुळे या संमेलनाची वातावरणनिर्मिती डोंबिवली, कल्याण, मीरा-भाईंदरमध्ये देखील होईल अशी खूणगाठ तेथील रसिकांनी बांधली होती. परंतु संमेलनाचे पूर्वरंग कार्यक्रम हे ठाणे शहरातच आयोजित केले होते. अगदी नियोजन पद्धतीने, रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात, कलावंतांच्या उपस्थितीत हे संमेलन केवळ ठाणे शहरापुरतेच मर्यादित राहिले असल्याच्या प्रतिक्रिया जिल्ह्यातील रसिकांकडून व्यक्त होत आहेत.
८४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन जेव्हा ठाण्यात झाले तेव्हा वाडा, जव्हार या ठिकाणी एकदिवसीय साहित्य संमेलने त्या त्या ठिकाणच्या रसिकांसाठी आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे संमेलनाची वातावरणनिर्मिती संपूर्ण ठाणे जिल्ह्यात निर्माण झाली होती. याच पद्धतीने जर नाटय़ संमेलनानिमित्त एकदिवसीय छोटेखानी संमेलने नाटय़ कलावंतांच्या उपस्थितीत जिल्ह्यात झाली असती तर तेथील नागरिकांनीही याचा आनंद घेतला असता. तसेच जिल्ह्यातील महापालिकांनी देखील संमेलनासाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. ठाणे म्हटले की, त्यात जिल्ह्यासह सर्व शहरे समाविष्ट होतात. मात्र डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर तसेच मीरा-भाईंदर या हद्दीपर्यंत संमेलन पोहोचलेच नाही. पूर्वरंग कार्यक्रम ठाण्यासह सर्व ठिकाणी आयोजित केले असते तर खऱ्या अर्थाने हे संमेलन ठाण्यात पोहोचले असते.
विविध कार्यक्रमांची रेलचेल, दिग्गज गायकांच्या उपस्थितीमध्ये तीन दिवस मासुंदा तलावाजवळचे वातावरण पहाटेच्या वेळी सूरमयी झाल्याचा प्रत्यय याची देही याची डोळा ठाणेकरांनी घेतला. दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मुख्य संमेलन, मो. ह. विद्यालय येथे नाटकांचे प्रयोग, काशिनाथ घाणेकर येथे एकांकिका, नाटय़प्रयोग, गडकरी रंगायतन येथे बालनाटय़े, टाऊन हॉल येथे एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण अशा विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमुळे ठाणे शहर या नाटय़ मैफलीत दंग झाले होते. मुख्य संमेलन मंडपात उभारलेल्या हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे नाटय़नगरीमध्ये उद्घाटन, कलावंत रजनी, चर्चासत्र, नाटय़रजनी अशा भरगच्च कार्यक्रमांनी नाटय़कलावंत तसेच रसिक ठाणेकर तृप्त झाले. त्याशिवाय मान्यवरांच्या सह्यांचे प्रदर्शन, पुस्तके, सी.डी. खाद्यपदार्थाचे स्टॉल यामुळे रसिकांना कार्यक्रमांबरोबरच याचाही आस्वाद घेता आला. तीन दिवस ठाणे शहर येणाऱ्या मान्यवरांचे अगदी मनापासून स्वागत करीत होते. नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांचे मालवणी शैलीतील भाषण अनेकांना आपलेसे करून गेले.
संमेलन यशस्वी करण्यामागे जसे ठाण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सरसावले होते, त्याप्रमाणेच ठाण्यातील पोलीस यंत्रणा, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महापालिका यांनीही संमेलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य दिले. व्यासपीठावर उपस्थित असलेले पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांनीही आपली हजेरी लावून लोकप्रतिनिधीबरोबर प्रशासनही पाठीशी असल्याचा विश्वास आयोजकांना दिला. कोणताही महोत्सव असला की, ठाणेकर तो आपलेसे करून यशस्वी करून दाखवितात ही ठाण्याची परंपरा आहे. मुंबईपाठोपाठ विकासाच्या प्रगतिपथावर असलेले ठाणे शहर सांस्कृतिक शहर म्हणून देखील ओळखले जाते. गेल्या दहा वर्षांचा आढावा घेतला तर ठाण्यात कोकण मराठी साहित्य संमेलन, ८४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन व आताचे ९६ वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन करण्याचा मान ठाण्याला मिळाला, त्यामुळे आता संमेलनाचे ठाणे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.