अंबरनाथ येथील जुने गाव परिसरात राहणाऱ्या अखिलेश पाटील याची हत्या त्याच्या चुलतभावानेच मालमत्तेच्या वादातून केल्याचे उघड झाले आहे.
आठवडाभरानंतर अखिलेशच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या तपासात त्याचा चुलतभाऊ सागर यानेच तीक्ष्ण हत्याराने हत्या केल्याचे उघड झाले आहे.
२० जुलै रोजी भरदुपारी अखिलेश पाटील याची तीक्ष्ण हत्यारांनी हत्या करण्यात आली होती. भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे अंबरनाथ परिसरात खळबळ उडाली होती. या हत्येतील आरोपी शोधण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी चार पथके विविध ठिकाणी रवाना केली होती. तसेच संशयित आरोपींचे रेखाचित्रदेखील प्रसिद्ध केले होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या १० जणांच्या पथकाने या हत्येप्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.
या हत्येतील आरोपी हा अखिलेश याचा चुलतभाऊ सागर पाटील आणि त्याचा मित्र सलमान खान याला पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. अखिलेश याची हत्या सागर याने मालमत्तेच्या वादातून केल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांनी दिली.
अखिलेश हा बांधकाम व्यावसायिक असून रियल इस्टेटचादेखील व्यवसाय करीत होता. दोन ठिकाणी व्यवहारात अखिलेश याने आपले लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा सागरचे म्हणणे होते. या संबंधीचा जाब विचारण्यासाठी सागर गेला असता अखिलेश याने सागरला शिवीगाळ करून दम दिला होता. हा राग मनात ठेवून सागरने अखिलेश याची हत्या केली.
सलमान हा पळून जात असताना कर्जत येथून तर सागर याला अंबरनाथमधून पोलिसांनी अटक केली.