३१ डिसेंबरच्या पाटर्य़ावर पोलिसांची नजर

नववर्षांच्या पाश्र्वभूमीवर येऊरमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या मद्यपाटर्य़ावर यंदा बंदी घालण्यात आली आहे. मद्य, अमली पदार्थाचे सेवन केल्याचे किंवा डीजे वाजविल्याचे आढळल्यास पार्टी करणाऱ्यांसह बंगले मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. २५८ बंगले मालकांना पोलिसांनी या संदर्भातील नोटिसा धाडल्या आहेत. ठाणे वाहतूक पोलीस २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत मद्य तपासणी मोहीमही हाती घेणार आहेत.

ठाणे शहरातील येऊर हा निसर्गरम्य परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत येतो. हा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. येऊरच्या टेकडीवर मोठय़ा प्रमाणात खासगी बंगले आणि हॉटेल आहेत. ३१ डिसेंबरला तिथे पाटर्य़ा आयोजित करण्यात येतात. अशा पाटर्य़ामध्ये मद्य आणि अमली पदार्थाचे सेवन केले जाते. डीजे वाजवून धांगडधिंगा केला जातो. त्यामुळे यंदा वर्तकनगर पोलिसांनी बंगल्यामधील पाटर्य़ामध्ये मद्य, अमली पदार्थ सेवन आणि डीजे वाजविण्यावर बंदी घातली आहे.

मद्यपी तपासणी मोहीम..

नववर्षांच्या पाटर्य़ा आठवडाभर आधीपासून रंगत असल्याची बाब लक्षात घेऊन ठाणे वाहतूक पोलिसांनी २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत मद्य तपासणीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. ठाणे ते बदलापूपर्यंत वाहतूक शाखेची १८ युनिट असून प्रत्येक युनिटकडे दोन ते तीन श्वास विश्लेषक यंत्रे आहेत. वाहतूक पोलीस महत्त्वाच्या नाक्यांवर वाहनचालकांची मद्य तपासणी करणार आहेत. त्यामध्ये मद्य प्राशन केलेल्या वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

येऊरमधील २५८ खासगी बंगलेमालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. पाटर्य़ामध्ये मद्य, अमली पदार्थ सेवन केल्याचे किंवा डीजे वाजविल्याचे आढळल्यास, पार्टी करणाऱ्यांसह बंगले मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. बंगले मालकांची संमती असल्याचे गृहीत धरून ही कारवाई केली जाणार आहे. येऊर आणि उपवन परिसरात नाकाबंदी करण्यात येणार असून भरारी पथकेही तैनात करण्यात येणार आहेत.    – प्रदीप गिरीधर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगगर