पोलीस, उत्पादन शुल्क विभागाकडून जबाबदारीची टोलवाटोलवी

आयात शुल्क चुकवून रेल्वेतून आणला जाणारा उंची परदेशी मद्याचा अवैध साठा ठाण्याच्या उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला असला, तरी मद्य तस्करी रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाकडे ठोस यंत्रणाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मद्य तस्करी रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे उत्पादन शुल्क विभागाचे म्हणणे आहे, तर संशयित सामानाची तपासणी करण्याचे काम रेल्वे सुरक्षा विभाग करतच असतो, असा रेल्वे पोलीस सुरक्षा दलाचा दावा आहे.

आयात शुल्क चुकवून रेल्वेतून दिल्लीहून मुंबईत विक्रीसाठी आणलेले तब्बल दोन कोटी रुपयांचे उंची मद्य उत्पादन शुल्क विभागाने अंधेरीतून जप्त केले.  त्यामुळे रेल्वे पोलीस तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या तपास यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गोवा, कोकणातून येणाऱ्या रेल्वे गाडय़ांची पनवेल येथे तपासणी केली जात असल्याचे सांगितले. छापादेखील टाकण्यात येतात, असेही ते म्हणाले.

आमची सुरक्षा योग्यच!

रेल्वेचे पोलीस दलाचे मध्य रेल्वे विभागीय आयुक्त सचिन भालोदे म्हणाले, ‘प्रवाशांचे चोरांपासून रक्षण करण्यावर भर असतो. संशयास्पद सामानाविषयी पोलीस दक्ष असतात. मात्र पार्सल तपासणीसाठी पथक नाही.’ रेल्वेतून होणारी मद्य तस्करी रोखणे अवघड आहे, असे उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे मद्याच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

विमान प्रवासाप्रमाणेच रेल्वेप्रवासादरम्यानही सामानाची तपासणी व्हायला हवी. रेल्वे अधिकाऱ्यांना उत्पादन शुल्क विभागाने याआधीही अवैध सामानाच्या सुरक्षेबाबत पत्र दिले आहे. रविवारी जप्त करण्यात आलेल्या अवैध मद्यसाठय़ासंबंधी रेल्वे पोलिसांशी लवकरच पत्रव्यवहार केला जाईल.

तानाजी साळुंखे, राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त, ठाणे 

रेल्वे गाडय़ा स्थानकांवर दोन मिनिटांपेक्षा अधिक काळ थांबवता येत नाहीत. त्यामुळे तपासावर मर्यादा येतात. अवैध सामान तपासणीसाठी खास पथके उपलब्ध नाहीत. उत्पादन शुल्क विभागाकडून यासंबंधी ठोस माहिती दिली गेल्यास, तस्करी रोखण्यासाठी उपाययोजना करता येतील.

सचिन भालोदे, विभागीय आयुक्त, रेल्वे पोलीस दल