करोना संशयितांची त्वरित माहिती कळवण्याच्या सूचना; रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही बाधा होण्याची भीती

ठाणे : ठाणे शहरातील एका खासगी रुग्णालयातून मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाला करोनाची लागण झाल्याची बाब समोर आल्यानंतर या रुग्णालयातील ३३ कर्मचारी आणि नऊ रुग्णांना अलगीकरण कक्षात ठेवण्याची वेळ आली आहे. असे प्रकार नवी मुंबई आणि अन्य शहरांतूनही उघड होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. करोनाची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची माहिती तातडीने महापालिका प्रशासनाला कळवावी, अन्यथा संबंधित रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिला आहे.

ठाण्यातील एका रुग्णालयात १८ ते २३ मार्चदरम्यान उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले होते. मात्र, रुग्णाची तब्येत पुन्हा बिघडल्यानंतर त्याला मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्याने ठाण्यातील ज्या रुग्णालयात उपचार घेतले होते, त्या रुग्णालयातील ३३ कर्मचारी व नऊ रुग्णांना अलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने खासगी रुग्णालयांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

सर्दी, खोकला, ताप अशा किरकोळ आजारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांकडे दुर्लक्ष करू नका आणि करोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वच रुग्णालयांनी सतर्क राहावे, अशा सूचना महापौर म्हस्के यांनी दिल्या आहेत. काही रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांपैकी काही रुग्ण करोना संक्रमित असल्याचे आढळून येत असून अनेक रुग्ण तसेच रुग्णालयातील कर्मचारी ठाणे शहरातील झोपडपट्टी विभागातील असून त्यांच्यामुळे परिसरातील नागरिकांनाही धोका पोहोचू शकतो. ही गंभीर बाब असल्याने ज्या रुग्णालयात करोनाबाधित रुग्णाने आधी उपचार घेतले आहेत, त्या रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका आणि त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात यावी, असे आदेश महापौर म्हस्के यांनी दिले आहेत. तसेच ठाणे शहरातील खासगी रुग्णालयामध्ये यापुढे तपासणी आणि उपचारार्थ दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाची पाश्र्वभूमी जाणून घेऊन त्यांच्यावर उपचार करावेत, जेणेकरून करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी निश्चितच मदत होईल. तसेच  करोनासदृश रुग्ण आढळून आल्यास त्याची माहिती महापालिका प्रशासनास देऊन पुढील अनर्थ टाळण्यासाठी दक्ष राहून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी रुग्णालयांना केले आहे.

‘खासगी रुग्णालयांची मदत घ्या’

ठाणे : करोना विषाणूचा सामना करण्यासाठी महापालिकेतील सर्व वैद्यकीय अधिकारी रात्रंदिवस काम करीत आहेत. या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करत असताना स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेळ पडली तर खासगी रुग्णालयांची मदत घ्या, अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिल्या. आरोग्य केंद्रात काम करत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करण्याच्या कामासाठी तातडीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आदेश काढावेत. त्या कर्मचाऱ्यांना सर्व प्रशिक्षण दिले जाईल. तसेच जे कर्मचारी हजर होणार नाहीत त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी महापालिका आयुक्तांना या वेळी दिले.

सवलतीच्या दरात चाचणी?

ठाणे शहरात परदेशातून आलेल्या नागरिकांना करोना चाचणी सक्तीची करणे गरजेचे आहे. वागळे इस्टेट येथे अशी चाचणी करण्यात येत आहे. महापालिका हद्दीतील रुग्णांना सवलतीच्या दरात ही चाचणी उपलब्ध देण्यासाठी संबंधितांशी चर्चा करून यावर मार्ग काढावा, असे आदेशही त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. ठाणे महापालिकेच्या ९ प्रभाग समितीमध्ये प्रत्येकी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी. तसेच गृह अलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आवश्यक ती मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.