ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडीत तीन दिवस तर कल्याण, डोंबिवलीत ३१ मार्चपर्यंत निर्बंध

ठाणे : करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांतील दुकाने व आस्थापना शुक्रवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये तीन दिवस बंद पाळण्याचा निर्णय पोलीस आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. तर भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथमध्येही तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कल्याण, डोंबिवली या शहरांत तर ३१ मार्चपर्यंत आस्थापना बंदी लागू करण्यात आली आहे. अर्थात या बंदमधून जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांना वगळण्यात आले आहे.

ठाण्यातील राम मारुती रोड, गोखले रोड या परिसरात मोठय़ा प्रमाणात विविध आस्थपना आहेत. तर ठाणे स्थानक परिसरात मोठी बाजारपेठ आहे.  या सर्वच ठिकाणी शनिवार आणि रविवार नागरिकांची खरेदीसाठी गर्दी असते. सण आणि उत्सवाच्या काळात या दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होते. पुढच्या आठवडय़ात गुढीपाडवा असल्यामुळे दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.  या पार्श्वभूमीवर नौपाडय़ाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल मांगले, ठाणेनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम सोमवंशी आणि राबोडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर.व्ही. शिरतोडे या तिन्ही अधिकाऱ्यांनी गुरूवारी परिसरातील व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. ‘तीन दिवसांनंतर दुकाने खुली करायची की नाही, याचा निर्णय परिस्थितीचा अंदाज घेऊन घेतला जाईल,’ असे नौपाडा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मितेश शहा यांनी सांगितले.

कल्याण, डोंबिवली शहरांतील जीवनावश्यक वस्तू, बेकरी, डेअरी, किराणा दुकाने, औषधालये, रुग्णालय, दवाखाने आणि भाजीपाला दुकाने सोडून इतर सर्व दुकाने ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आज, शुक्रवार ११ वाजल्यापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

भिवंडी तसेच उल्हासनगर पालिका क्षेत्रांतील भाजीपाला, दुध, जीवनावश्यक वस्तु, औषधालय, रेस्टॉरंट आणि खानावळी वगळून शहरातील कारखाने, दुकाने, व्यापारी पेठा आणि इतर आस्थापना पुढील तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रमुखांनी दिले आहेत.  अंबरनाथ नगरपालिकेत गुरूवारी अधिकारी आणि व्यापारी संघटनांमध्ये पार पडलेल्या बैठकीत १९ मार्च रात्री १२ वाजल्यापासून पुढील तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शहरातील रिक्षा वाहतुकीमुळेही करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने, पुढील तीन दिवस शहरातील रिक्षाही बंद ठेवण्यात येणार असून आप्तकालिन परिस्थितीसाठी प्रत्येक रिक्षा स्टॅण्डवर पाच रिक्षांची सेवा सुरू राहणार आहेत. बदलापुरात बाजारपेठा एक दिवसाआड आलटून पालटून बंद ठेवण्याला व्यापाऱ्यांनी संमती दिली.

फेरीवाल्यांनाही मनाई आदेश

ठाणे शहरातील फेरीवाले, हातगाडय़ा, खाद्यपदार्थाचे ठेले ताबडतोब बंद करण्याचे आदेश जारी करण्याच्या सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

आठवडी बाजार ३१ मार्च पर्यंत बंद

ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात भरणारे आठवडी बाजार तात्काळ बंद करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हातील सर्व आठवडी बाजार ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.