फटाक्यांची रंगीत आतशबाजी.. दिमाखदार पोशाखात सार्वजनिक स्थळी भेटून शुभेच्छा देण्याचा तरुणाईचा सळसळता उत्साह.. दिवाळी पहाटच्या निमित्ताने संस्कृतीखुणांचा वारसा जपणारे नृत्य-गीत जलसे.. हा मुंबई आणि विशेषत: डोंबिवलीतील दिवाळसणाच्या नांदीचा शिरस्ता यंदा करोनामुळे मोडणार आहे. मुंबईत फुलबाजी, अनार याच फटाक्यांची विक्री केली जाणार असून डोंबिवलीच्या प्रसिद्ध फडके रोडवर दिवाळी पहाटे होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

हवा आणि ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी, तसेच करोनाबाधित रुग्णांना होणारा संभाव्य त्रास टाळण्यासाठी मुंबई पालिकेने यंदा एकच दिवस केवळ फुलबाजी आणि अनारसारख्या फटाक्यांची विक्री करण्यास परवानगी देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अन्य फटाक्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ आणि आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त इक्बालसिंह चहल चहल यांनी दिला. त्यामुळे मुंबईत यंदा फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी होईल.

कित्येक वर्षांपासून डोंबिवली शहरातील फडके रस्त्यावर अबालवृद्धांकडून अभूतपूर्व गर्दीसह साजरा होणारा दिवाळी पहाटेचा जल्लोश यंदा रद्द करण्यात आला आहे.  करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून शहरातील श्री गणेश मंदिर संस्थानचे ग्रामदैवत गणपती मंदिर बंद असून हे मंदिर दिवाळीच्या दिवशीही बंद राहील. त्यामुळे भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे. तर, फडके रस्त्यावर दिवाळीच्या दिवसांमध्ये तरुणांनी गर्दी करू नये, यासाठी महापालिका आणि पोलीस नियोजन करीत आहे.

कारवाईबाबत संभ्रम..

करोनाबाधित रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून मुंबईत फटाक्यांवर निर्बंध आले. फुलबाजी, अनार व्यतिरिक्त इतर फटाके विकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र हे आदेश  आदेश अद्याप पालिकेच्या प्रशासकीय विभागीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, असे काही विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे विक्रेत्यांवरील कारवाईबाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

उत्साहचित्र हरवणार..

डोंबिवलीतील फडके रस्त्यावर दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी ठाणे, मुंबई, कल्याण, कर्जत आणि कसाऱ्यापासून तरुणाई एकत्र येते. श्री गणेश मंदिर संस्था आणि इतर सामाजिक संस्थातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. यंदा  फडके रोडचा बाजीप्रभू चौक, गणपती मंदिराकडील बाजू बंदिस्त केली जाईल. त्याचप्रमाणे आगरकर रस्ता, टिळक रस्ता, नेहरू रस्ता पहाटे ते दुपापर्यंत वाहनांसाठी बंद असेल. त्यामुळे या भागातील उत्साहचित्र यंदा पहायला मिळणार नाही.