मंजूर प्रकरणे जाहीर करणे यापुढे महापालिकांना बंधनकारक
वृक्षांची राजरोसपणे कत्तल करण्याच्या प्रस्तावांना वृक्ष प्राधिकरण समितीत घाईगर्दीत मंजुरी देऊन ठरावीक बिल्डर आणि व्यावसायिकांचे ‘गुपचूप’ चांगभलं करणाऱ्या महापालिकांच्या कार्यपद्धतीवर यापुढे पर्यावरण प्रेमी आणि शहरातील दक्ष नागरिकांना बारीक लक्ष ठेवता येणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीसह राज्यातील सर्व महापालिकांनी यापुढे वृक्षतोडीस परवानगी दिल्याची सर्व प्रकरणे आपल्या संकेतस्थळावर टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे झाड कापले जाणार आहे त्याचे नाव, वयोमान, आवश्यकता यासंबंधीची सविस्तर माहिती संकेतस्थळावर टाकावी लागणार आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमधील विकास प्रकल्पांमध्ये अडसर ठरत असलेल्या वृक्षांवर कुऱ्हाड फिरविण्याचे प्रस्ताव नियोजन प्राधिकरण असलेल्या संस्थांकडे मंजुरीसाठी येत असतात. शहरांतील बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागेवर मोठी गृहसंकुले, मॉल उभे राहिले आहेत. या नव्या संकुलांचे बांधकाम करत असताना अक्षरश हजारो वृक्षांवर कुऱ्हाड चालवली गेली आहे. हे करत असताना अनेक ठिकाणी पुरेशी पारदर्शकता बाळगली जात नसल्याच्या तक्रारी पर्यावरण प्रेमींकडून पुढे येऊ लागल्या आहेत. अशा प्रकारे परवानगी देण्यासाठी प्रत्येक महापालिकेत वृक्ष प्राधिकरण समितीची रचना करण्यात आली आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि कमीतकमी झाडे कापली जावीत हे पाहाण्याचे काम या समितीवर सोपविण्यात आले आहे. असे असताना काही ठिकाणी प्रत्येक झाडामागे हजारो रुपये उकळून वृक्ष कापणीस मोठय़ा प्रमाणावर परवानग्या दिल्या जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. या पाश्र्वभूमीवर प्रत्येक महापालिकेने वृक्ष कापणीच्या प्रस्तावांची सविस्तर यादी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असे आदेश नगरविकास विभागाने दिले आहे. गेल्या आठवडय़ात यासंबंधीचे आदेश काढण्यात आले असून त्यानुसार प्रत्येक आठवडय़ात किती वृक्ष कापले गेले आणि नव्याने पुनरोपीत करण्यात आले हेदेखील संकेतस्थळावर टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा आदेश येण्यापूर्वी ठाणे महापालिकेने अशी यादी संकेतस्थळावर टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र, मुंबईतील एका बडय़ा बिल्डरच्या प्रकल्पाचा मार्ग सुकर करण्यासाठी मध्यंतरी ४०० वृक्षांच्या कत्तलीस परवानगी देण्यात आली. तेव्हापासून अनियमितता आली , अशी माहिती वृक्ष प्राधिकरण समितीमधील वरिष्ठ सदस्याने दिली. नगरविकास विभागाच्या नव्या आदेशामुळे यामध्ये खंड पाडता येणार नाही, असा दावाही सूत्रांनी केला.

यादी टाकतो..पण नियमितपणाचे पहावे लागेल!
वृक्ष कापण्यास परवानगी देताना यासंबंधीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते का? अशी विचारणा ठाणे महापालिकेचे वृक्ष अधीक्षक केदार पाटील यांच्याकडे केली असता त्यांनी सुरुवातीला होकार दिला. मात्र, नियमितपणे हे केले जाते का ते पाहून सांगावे लागेल, असे ते म्हणाले.