भाईंदर : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या निधनाचे वृत्त उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील सर्व अधिकारी आणि कर्मचारीवृंदाच्या मनाला चटका लावून गेले. पंतप्रधान असताना अटलजींनी प्रबोधिनीच्या आवारात आंब्याचे झाड लावले होते. हा आम्रवृक्षच आता अटलजींच्या प्रबोधिनीतील अस्तित्वाची कायम आठवण देत राहणार आहे, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया प्रबोधिनीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

अटलबिहारी वाजपेयी आणि रामभाऊ म्हाळगी यांचे नाते अतूट आहे. २००३ मध्ये पंतप्रधान असताना अटलजींच्या हस्ते रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यावेळी अटलजींनी प्रबोधिनीमध्ये वास्तव्यदेखील केले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यावेळचे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि भाजपचे त्यावेळचे अनेक मंत्री उपस्थित होते. प्रबोधिनीच्या आवारातच तेजोनिधी या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीशेजारी अटलजींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यांनी त्यावेळी लावलेले आंब्याचे झाड आज डेरेदार झाले असून त्याला रसाळ आंबेदेखील येत आहेत.

काही वर्षांपूर्वी या झाडाचे तीन डझन आंबे अटलजींना पाठविण्यात आले होते. मधुर आणि रसाळ आंबे अटलजींना अत्यंत आवडले होते आणि तसा अभिप्राय त्यांनी दूरध्वनीवरून व्यक्त केला होता, अशी आठवण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे चंद्रकांत जाधव यांनी सांगितली.

प्रबोधिनीच्या लोकापर्णाच्या वेळी प्रबोधिनीतील महिला वर्गाने अटलजींना पुरणपोळी खाऊ घातली होती. मराठमोळा हा पदार्थाला अटलजींनी मन:पूर्वक दाद दिली होती. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी म्हणजे एक नवीन सृष्टी आहे, असे गौरवोद्गार त्यांनी त्यावेळी व्यक्त केले होते. अटलजींनी आवारात लावलेल्या आंब्याच्या वृक्षाला त्यांच्या नावाची पाटीदेखील लावण्यात आली आहे. आज अटलजी आपल्यात नसले तरी या आंब्याच्या वृक्षाच्या रूपाने ते कायम आमच्यात असणार आहेत, अशी श्रद्धांजली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने अर्पण करण्यात आली आहे.