News Flash

भूमिपुत्रांच्या तडजोड बैठका

निवडणुकीत पराभव टाळण्यासाठी सर्वपक्षीय तडजोडीसाठी तयार

भूमिपुत्रांच्या तडजोड बैठका

निवडणुकीत पराभव टाळण्यासाठी सर्वपक्षीय तडजोडीसाठी तयार

सागर नरेकर, लोकसत्ता

बदलापूर : अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सर्वपक्षीयांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यातही भूमिपुत्र म्हणून आपला टक्का राखण्यासाठी  आजी-माजी भूमिपुत्र नगरसेवकांनी गुप्त बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. आपापसांत लढून पराभूत होण्यापेक्षा वेळेप्रसंगी तडजोड करण्याची तयारीही अनेक नगरसेवकांनी व्यक्त केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

नगरपालिकेच्या विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ मे महिन्यात संपुष्टात येणार असल्याने निवडणूक आयोगातर्फे निवडणूकपूर्व तयारी सुरू आहे. गेल्याच आठवडय़ात दोन्ही नगरपालिकांमध्ये प्रारूप प्रभाग आरक्षण जाहीर झाले. अंतिम आरक्षण जाहीर होणे अद्याप शिल्लक असले तरी प्रारूप आरक्षणात बदल होणे अशक्य असल्याने सर्वपक्षीयांनी तयारीला सुरुवात केली आहे.

दोन्ही शहरांमध्ये बहुभाषिक नवमतदार मोठय़ा संख्येने वाढला आहे. तरीही दोन्ही नगरपालिकांमध्ये भूमिपुत्र नगरसेवकांची संख्या मोठी आहे. अंबरनाथ नगरपालिकेत २५ तर कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत ३० नगरसेवक भूमिपुत्र आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे आपला टक्का घटण्याचा धसका बहुतांश भूमिपुत्र नगरसेवकांनी घेतला आहे. त्यामुळे आपापल्या समाजांच्या ज्येष्ठांना एकत्र करत निवडणुकीला कसे सामोरे जायचे, याबाबत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.  एकमेकांशी लढण्यात पैसा, वेळ खर्ची घातल्याने भूमिपुत्र नसलेल्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी भूमिपुत्र आजी-माजी नगरसेवकांचा खटाटोप सुरू असल्याचे बोलले जाते. काही तरुण इच्छुकांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न या बैठकीच्या निमित्ताने केला जातो आहे. बदलापुरात कात्रप, मांजर्ली, वालिवली, खरवई आणि बदलापूर गावात अशा काही बैठका नुकत्याच पार पडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. अंबरनाथ शहरात अशा बैठका तुलनेने कमी झाल्या आहेत.

निवडणुका बिनविरोध करण्याचाही मानस

२०१५ च्या निवडणुकीत अंबरनाथमध्ये ३ तर कुळगाव-बदलापूर नगरपालिकेमध्ये ४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. असाच प्रयोग यंदाही करण्याचा मानस दोन्ही नगरपालिकांतील वजनदार नगरसेवकांनी व्यक्त केला असून त्यासाठीही बैठकांचा जोर वाढला आहे. त्यासाठी इच्छुकांना मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2020 3:34 am

Web Title: all parties started plan for ambernath and badlapur kulgaon municipal council elections zws 70
Next Stories
1 ठाणेकरांचे पाणी महागणार!
2 शहरांतर्गत मेट्रोचा प्रकल्प रद्द
3 वापरलेल्या मास्क विक्रीची पाळेमुळे खोलवर?
Just Now!
X