बेकायदा फलकांवर कारवाई करण्याची सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

ठाणे शहरातील रस्त्यांवर तसेच पदपथांवर लावण्यात येणारे बेकायदा फलक हटवण्याची मागणी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. अशा फलकबाजीत आघाडीवर असणारी राजकीय मंडळीच फलकबाजीला चाप लावण्यासाठी आग्रही असल्याचे पाहून महापालिका प्रशासनानेही येत्या काही दिवसांत अशा फलकांसह राजकीय पक्षांचे झेंडे व बेकायदा बॅनरविरोधात कारवाई केली जाईल, हे स्पष्ट केले.

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा शहरातील रस्ते आणि पदपथांवर लोखंडी फ्रेम उभारून  फलक उभारण्यात आले असून त्यामध्ये राजकीय पक्ष, मंडळे आणि विविध संस्था आघाडीवर आहेत. तसेच अनेक ठिकाणी राजकीय पक्ष तसेच विविध संघटनांनी झेंडय़ांसाठी खांब उभे केले आहेत. रस्त्यावर उभारण्यात आलेल्या फलकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. तसेच पदपथांच्या मधोमध असे फलक व खांब उभारण्यात आल्याने त्या ठिकाणाहून नागरिकांना चालणे शक्य होत नाही. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दशरथ पालांडे यांनी सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या मुद्दय़ाकडे लक्ष वेधले व बेकायदा फलक व ध्वजस्तंभ हटवण्याची मागणी केली.

बैठकीत सहभागी असलेल्या इतर पक्षांच्या सदस्यांनीही फलक हटवण्याच्या मागणीला एकमुखी पाठिंबा दिला.  मात्र, ही कारवाई शहरातील कोणत्या भागातून सुरू करावी, यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये जुंपली. वागळे इस्टेट भागातील आयटीआय सर्कलपासून ही कारवाई सुरू करावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या वागळे इस्टेट परिसरातून ही कारवाई सुरू व्हावी असा अप्रत्यक्ष आग्रह धरत विरोधी पक्षांनी यावेळी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा प्रकारची कारवाई शहरात सुरू आहे. मात्र, कारवाईनंतरही अशा प्रकारचे फलक पुन्हा लावले जात असल्याचे पालिका उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी स्पष्ट केले. रस्ते तसेच पदपथ अडवून राजकीय पक्ष, मंडळे, संस्थांनी बेकायदा फलक, झेंडे आणि बॅनरवर कारवाईसंबंधीचे आदेश सर्व सहायक आयुक्तांना पुन्हा देण्यात येतील आणि त्यांच्यामार्फत ही कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.