01 March 2021

News Flash

सर्वधर्मीय स्मशानभूमी वादात

वसई-विरार शहरात लोकसंख्या वाढत असली तर दफनभूमी आणि स्मशानभूमीचा प्रश्न कायम आहे.

सहा एकर जागा हडप केल्याचा आरोप; आयुक्तांकडून चौकशीचे आदेश

वसईमध्ये उभारण्यात येणारी सर्वधर्मीय स्मशानभूमी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या स्मशानभूमीची जागा ११ एकर मंजूर झाली असताना केवळ पाच एकर जागेवरच कुंपण घालण्यात आले आहे. त्यामुळे सहा एकर जागा हडपण्यात येत असल्याचा धक्कादायक आरोप ‘वसई तालुका मुस्लिम कब्रस्तान कमिटी’ने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कमिटीने केली असून आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

वसई-विरार शहरात लोकसंख्या वाढत असली तर दफनभूमी आणि स्मशानभूमीचा प्रश्न कायम आहे. ग्रामपंचायत काळापासूनच्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या स्मशानभूमी शहरात आहेत. त्यांची संख्याही कमी आहे. मुस्लिम समजाला तर दफनभूमीचा सगळ्यात मोठा प्रश्न भेडसावत आहे. त्यासाठी सनसिटी गास रस्त्यावर सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमी आणि दफनभूमी उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यासाठी केंद्र सरकारकडून मिठागराची जागाही मंजूर करवून घेण्यात आली. एकूण ११ एकर जागेवर ही सर्वधर्मीय स्मशानभूमी बनवली जाणार आहे. सर्वधर्मीयांमध्ये जागेचे वाटप होऊन प्रत्येकाची अंत्यविधी भूमी उभारण्यात येणार आहे.  या स्मशानभूमीच्या जागेला संरक्षण भिंत बांधण्याचे कंत्राट नुकतेच देण्यात आले होते. त्यासाठी सव्वा चार कोटी रुपयांचे काम ठेकेदाराला देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात केवळ सहा एकर जागेवरच ही संरक्षक भिंत बांधण्यात आली असल्याचा आरोप वसई तालुका मुस्लीम कब्रस्तान कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. खलील शेख यांनी केला आहे. या कामासाठी ठेकेदाराला पूर्ण बिलाची रक्कमही अदा करण्यात आली आहे. जर आरक्षित जागा ११ एकर होती मग केवळ ६ एकर जागेवरच संरक्षक भिंत का बांधली. काम अपूर्ण असेल तर ठेकेदाराला कामाचे सगळे पैसे का देण्यात आले, असा सवालही शेख यांनी केला आहे. उर्वरित ५ एकर जागा हडप करण्याचे षड्यंत्र यामागे असू शकेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केलीे.

स्थानिकांचा विरोध

सनसिटी येथील सर्वधर्मीय स्मशानभूमीस स्थानिक रहिवाशांचा विरोध आहे. हा विभाग विकसित होत असून सनसिटी-गास रस्त्यामुळे जागेचे आणि घरांचे भाव वाढले आहेत. मुस्लीम समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. अनेक वर्षांपासून झगडून त्यांनी विरार रेल्वे स्थानकाजवळ दफनभूमीसाठी जागा मिळवली होती. परंतु पालिकेने तेथील आरक्षण हटवून ते बोळिंज येथील म्हाडाच्या जागेवर टाकल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा दफनभूमीचा प्रश्न रखडला आहे. त्यासाठी सर्वपक्षीय मोर्चाही पालिकेवर आणण्यात आला होता. ही दफनभूमी आणि स्मशानभूमीची जागा कमी केल्यास भविष्यात पुन्हा मोठा प्रश्न निर्माण होईल अशी भीती कब्रस्तान कमिटीने व्यक्त केली आहे.

सर्वधर्मीय स्मशानभूमीची जागा हडप केल्याबाबत तक्रार प्राप्त झाली असून त्याची चौकशी केली जाईल. प्रत्यक्ष जागेचे मोजपापही पुन्हा करण्यात येईल आणि काम तपासण्यात येईल.

– सतीश लोखंडे, आयुक्त, वसई-विरार महापालिका

ही जागा मिठागराची असल्याने केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. जागा हडप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप बिनबुडाचा आहे.

– प्रकाश रॉड्रिक्स, सभापती, प्रभाग समिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 1:30 am

Web Title: all religions crematory controversy in vasai
Next Stories
1 ‘सूर्या’च्या मार्गातील ‘अंधार’ दूर
2 पालिकेने दिले, पालिकेनेच तोडले!
3 वसई रोड स्थानकात प्रसाधनगृहांची कमतरता
Just Now!
X