सण-उत्सवांच्या खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी व्यापारी संघटनांची मागणी

ठाणे : महापालिका क्षेत्रातील टाळेबंदी शिथिल करताना करोना अतिसंक्रमित परिसर नसलेल्या भागात सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्याची परवानगी काही दिवसांपूर्वी दिली आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात येऊ घातलेल्या सण-उत्सवाच्या काळात नागरिकांची दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असून ही गर्दी कमी करण्यासाठी सम-विषमऐवजी रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी व्यापारी संघटनांनी महापालिकेकडे केली आहे.

जून महिन्यात टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यानंतर महापालिका क्षेत्रातील अर्थचक्र रुळावर यायला लागले होते. मात्र करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याचे कारण पुढे करत महापालिकेने २ जुलैपासून पुन्हा टाळेबंदी लागू केली. १९ जुलै रोजी महापालिकेने टाळेबंदी शिथिल करत करोना अतिसंक्रमित परिसर नसलेल्या भागात सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव तसेच इतर सण येऊ घातले आहेत. सणांनिमितत नागरिक खरेदीसाठी दुकानांमध्ये दरवर्षी गर्दी करतात. मात्र यंदा रस्त्याच्या एकाच बाजूच्याच दुकानांमध्ये सुरू ठेवण्यास परवानगी असून यामुळे विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या कमी असेल. त्यामुळे या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करत व्यापारी संघटनांनी दोन्ही बाजूंची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.

‘दोन्ही बाजूच्या दुकांनाना परवानगी द्या’

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील गोखले रोड, राम मारुती रोड आणि ठाणे बाजारपेठ या ठिकाणी विविध वस्तू विक्रीची दुकाने आहेत. या ठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. या तिन्ही भागांतील व्यापारी संघटनांनी उत्सवाच्या काळात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी दोन्ही बाजूंची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. नागरिकांची गर्दी होऊ नये, सामाजिक अंतराचे पालन व्हावे आणि करोनाचा संसर्ग धोका टळावा, या उद्देशातून ही मागणी केल्याची माहिती नौपाडा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मितेश शहा यांनी दिली.