फिरणे, सायकल चालवण्यासाठी मुभा देण्याचा पोलिसांचा प्रस्ताव फेटाळला

जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील टाळेबंदी वाढवली जात असताना येत्या रविवारपासून काही निर्बंध शिथिल करावेत आणि ठाणेकरांना सकाळच्या वेळेत चालणे, धावणे तसेच सायकल चालविण्यासारखे व्यायाम करण्यास मुभा दिली जावी यासाठी ठाणे पोलिसांनी धरलेला आग्रह महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

सातत्याने टाळेबंदी लादली जात असल्यामुळे ठाणेकरांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काही प्रमाणात सवलत दिली जावी आणि किमान सकाळच्या वेळेत व्यायामासाठी सवलत देता येईल का ते पाहावे, अशी पोलिसांची सूचना होती. येत्या १९ जुलैपर्यंत कठोर टाळेबंदी लागू करावी या भूमिकेवर महापालिका प्रशासन ठाम राहिल्याचे सांगितले जाते.

करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ठाणे महापालिका क्षेत्रात २ जुलैपासून संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. रविवारी या टाळेबंदीची मुदत संपत असताना महापालिका प्रशासनाने १९ जुलैपर्यंत पुन्हा एकदा टाळेबंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या आग्रहामुळे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी तातडीने यासंबंधीचे आदेश काढल्यामुळे शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

राज्य सरकारने जून महिन्यापासून टाळेबंदीतील निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सकाळी ५ ते सायंकाळी ७ या वेळेत नागरिकांना चालणे, धावणे, सायकल चालविणे यासारख्या व्यायामप्रकारांसाठी बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली होती. हे करत असताना नागरिकांनी गर्दी करू नये,  पालन करावे अशा अटी घालण्यात आल्या होत्या. हे निर्बंध शिथिल केल्यानंतर मुंबई, ठाण्यातील काही ठिकाणी सकाळच्या वेळेत फेरफटका मारणाऱ्यांची गर्दी झाली होती.

ठाणे जिल्ह्य़ातील शहरांमध्ये पुन्हा टाळेबंदी लागू करताना स्थानिक स्वराज्य संस्थांनी सकाळच्या वेळेत फेरफटका मारणे, व्यायामावर निर्बंध लागू केले. दरम्यान, टाळेबंदीची मुदत वाढवीत असताना नागरिकांना व्यायाम करण्यासाठी बाहेर पडू द्यावे, अशी सूचना ठाणे पोलीस दलाने केली होती.  मात्र, कोणतीही सवलत देण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिल्याचे वृत्त आहे. यासंबंधी महापालिका तसेच पोलीस दलातील एकाही अधिकाऱ्याने स्पष्ट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

पोलिसांना कठोर होण्याच्या सूचना 

टाळेबंदीची मुदत वाढवीत असताना ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी यांसारख्या शहरांत निर्बंधांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी वेळप्रसंगी पोलिसांनी कठोर व्हावे, अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचे वृत्त आहे. कल्याण-डोंबिवली शहरात टाळेबंदीच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी आहेत.