News Flash

बिगर करोना रुग्णालयांनाही रेमडेसिविरचा पुरवठा करा

ठाण्याच्या महापौरांची मागणी

ठाण्याच्या महापौरांची मागणी

ठाणे : बिगर करोना खासगी रुग्णालयांमध्ये करोना संशयित रुग्णांना चाचणी अहवाल येईपर्यंत उपचारासाठी दाखल करून घेतले जात असून अशा रुग्णांनाही रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असते. त्यामुळे अशा रुग्णालयांमध्येही इंजेक्शनचा पुरवठा करण्याची मागणीही ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच शहरामध्ये महापालिकाव्यतिरिक्त ४० खासगी रुग्णालयांना प्रशासनाने करोना रुग्णालयांची मान्यता देऊ केली असली तरी, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये केवळ १६ रुग्णालयांचीच नावे समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी उर्वरित रुग्णालयांचा यादीत समावेश करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

करोनाची बाधा आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम शीघ्र प्रतिजन चाचणी केली जाते. त्याचा अहवाल काही मिनिटांत मिळतो. हा अहवाल नकारात्मक आला आणि त्यानंतरही रुग्णांमध्ये करोना लक्षणे दिसून येत असतील, तर त्याची आरटीपीसीआर चाचणी केली जाते. मात्र या चाचण्या करण्यासाठी नागरिक मोठय़ा संख्येने येत असून यामुळे चाचणी अहवाल येण्यास तीन ते चार दिवसांचा अवधी लागत आहे. या रुग्णांकडे करोना सकारात्मक अहवाल नसल्यामुळे त्यांना करोना रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. परंतु करोनाचीच लक्षणे असल्यामुळे डॉक्टर त्यांना बहुतांश वेळा एचआरसीटी तपासणी करण्यास सांगतात आणि यामध्ये फुप्फुसामध्ये संसर्ग आढळून आलेल्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असते. परंतु खासगी रुग्णालयात हे इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे योग्य उपचार करण्यास विलंब होतो. त्यामुळे बिगर करोना रुग्णालयात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध असणे आवश्यक आहे. महापालिकेने मान्यता दिलेल्या खासगी करोना रुग्णालयामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाते. त्याचप्रमाणे बिगर करोना रुग्णालयांमध्येही रेमडेसिविर इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन तिथे इंजेक्शनचा पुरवठा करावा, अशी मागणी महापौर म्हस्के यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. ठाणे शहरातील करोना रुग्णांवर पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात उपचार करण्यात येतात. याशिवाय, शहरातील ४० खासगी रुग्णालयांना करोना रुग्णालये म्हणून प्रशासनाने मान्यता दिली आहे. असे असले तरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये शहरातील केवळ १६ रुग्णालयांच्या नावाचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 1:22 am

Web Title: also supply remdesivir in non corona hospital says thane mayor zws 70
Next Stories
1 कळवा, मुंब्य्रातील करोना रुग्णालये प्राणवायू पुरवठ्याअभावी बंद
2 हळदी समारंभात बैल नाचविल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा
3 बँक ग्राहकांचे पैसे परस्पर काढले!
Just Now!
X