प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही संस्था या ठिकाणी साखळी पद्धतीने काम करीत नाहीत. महापालिका, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या कामाच्या पद्धती वेगळ्या आहेत. या संस्थांनी प्रदूषणाविरोधात एकत्रित काम केल्यास हवेची शुद्धता आणि प्रदूषण कमी होण्यास साहाय्य होईल. परंतु तसे होत नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. रस्त्यावरील वाहनांची अहोरात्र वर्दळ, दगडखाणी आणि हजारो कंपन्यांमधून सोडण्यात येत असलेला धूर यामुळे डोंबिवली-बदलापूर ही सर्वाधिक प्रदूषित शहरे असल्याचे ‘मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

कल्याण, उल्हासनगर, नवी मुंबई शहरे ही औद्योगिक, व्यापाराची मोठी केंद्रेअसल्याने या ठिकाणी खासगी वाहनांसह अवजड वाहनांची मोठय़ा संख्येने आहे. वाहनांमधून वातावरणात मिसळणाऱ्या नायट्रोजन ऑक्साइड या शहरांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  शिळफाटा ते तुर्भे पट्टय़ात मोठय़ा संख्येने दगडखाणी आहेत. या खाणींमधून सतत दगड फोडण्याचे काम सुरू असते. त्यामुळे उडणाऱ्या धुरळ्यामुळे परिसरात प्रदूषणामुळे जीवसृष्टीला मारक अशी परिस्थिती झाल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे.  एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळांनी एकत्रितपणे औद्योगिक क्षेत्रात काही सुधारणा करण्यासाठी कंपन्यांचे सांडपाणी बंदिस्त वाहून नेणे, सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र असे प्रकल्प उभारणे, त्यांची वेळो वेळी देखभाल दुरुस्ती विषयाकडे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक असते. परंतु शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने जलप्रदूषण नियंत्रण, हवेतील प्रदूषण नियंत्रणाचे उपक्रम या संस्थांना राबवीत नसल्याची खंत या आराखडय़ात व्यक्त करण्यात आली आहे.

कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली परिसरात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे होणारी तोडफोड आणि सिमेंटच्या उधळ्यामुळे वातावरण कमालीचे प्रदूषित होत आहे. या वातावरणात राहणाऱ्या रहिवाशांना फुप्फुस, हृदय, दमा, सततची सर्दी, डोकेदुखीचे विकार होत असल्याचे निष्कर्ष मुंबईतील पर्यावरणविषयक संशोधन करणाऱ्या एका संस्थेने काढला आहे, असे अहवालात म्हटले आहे. रासायनिक सांडपाणी प्रक्रिया  होत नसल्याने पाणी प्रदूषित झाले आहे.