आद्र्रतेमुळे स्पर्धाविक्रमांची नोंद नाही, फन रनला उत्तम प्रतिसाद, सामाजिक संदेशांद्वारे जनजागृती

वसई-विरार महापौर मरेथॉन स्पर्धेत सकाळच्या वेळी पडलेल्या धुक्यातून वाट काढत धावणाऱ्या विविध राज्यातून आलेल्या धावपटूंनी वसईकरांची मने जिंकली, परंतु सकाळच्या वेळी असलेल्या आद्र्रतेमुळे स्पर्धाविक्रमांची नोंद होऊ शकली नाही.

पहाटेच्या थंड वातावरणात सकाळी ठीक सहाच्या ठोक्याला वसई-विरार शहर महानगरपालिका आयोजित महापौर मॅरेथॉनला सुरुवात झाली. स्पर्धा मार्गा वर पडलेले धुके, रस्त्याच्या दुतर्फा शालेय विद्यर्थी तसेच नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित असल्याने स्पर्धकांचा उत्साह वाढला होता. स्पर्धकांसह, पाठिराख्यांचा, बघ्यांचा उत्साह ओसांडून जात असल्याने एकूणच वातावरण उत्साही झाले होते. स्पर्धेत पूर्ण मॅरेथॉन, अर्धमॅरेथॉनबरोबरच ‘फन रन’मध्येही मोठय़ा प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते. ‘फन रन’मधून स्पर्धकांनी जनतेला अनेक सामाजिक संदेश दिले. शौचालय बांधा, प्लास्टिक हटाव, पाणी वाचवा, स्वछता हीच मानव सेवा असे संदेश यावेळी देण्यात आले. अनेक सहभागी तरुणांनी इंटरनेटचा वाढत वापर हानीकारक असल्याचा संदेश दिला.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सिनेसृष्टीतील अनेक सिलिब्रिटींनी या ठिकाणी सकाळी ६ वाजल्यापासून उपस्थिती लावली होती. यात मनमित पेम, अभिजीत चव्हाण, आदिती सारंगधर, ऋजुता देशमुख, सुप्रिया पाठारे, जयंत वाडकर, समीर चौघुले, अरुण कदम, गणेश यादव यांचा समावेश होता. तर सिने कलाकार राहुल बोस आणि मंदिरा बेदी हे स्पर्धेचे ब्रॅण्ड अँबेसेडर होते. सिनेकलाकारांसह मॅरेथॉन स्पर्धेत अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावण्याबरोबर काही मान्यवर या स्पर्धेत धावले. यात नगरसेवक हार्दिक राऊत यांच्यासह पोलीस उपअधीक्षक जयंत बजबळे, विरारचे पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी सहभाग नोंदवला होता.

मॅरेथॉन बिनाविरोध

वसई-विरार महापौर मॅरेथॉनचे हे सातवे वर्ष होते. यावर्षी मरेथॉनला मोठा प्रतिसाद मिळाला. मुख्य म्हणजे मरेथॉनला विरोध न झाल्याने स्पर्धा यशस्वी झाली.

उलटय़ा दिशेने धाव

मॅरेथॉनमध्ये नालासोपारा येथील मयूर दुमासिया हे उलटय़ा दिशेने धाव घेत अर्धमॅरेथॉन पूर्ण केली. १५ वर्षे आधी रेल्वे अपघातात मयूर यांनी आपला उजवा हात गमावला आहे. त्यामुळे आयुष्यात हताश न होता पुढे जाण्याचा सल्ला देत मयूर यांनी ही धाव धावल्याचे म्हटले. मयूर हे अभिनव महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतात. आजपर्यंत ३३ मॅरेथॉनमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला असून सर्वच वसई-विरार मॅरेथॉन धावले आहेत.

गेल्या ४ वर्षांपासून मी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होत आहे. पहिल्यांदा सहभाग घेतल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला तसेच आपल्या आरोग्यासाठी धावणे अतिशय उपयुक्त आहे, त्यामुळे दरवर्षी मी सहभागी होत असून सर्वाना सहभागी होण्याचा सल्ला मी देईन.

हर्षला वर्तक, शिक्षिका