कंत्राटाशिवाय वसुली; अनधिकृत पावती देत पालिकेच्या महसुलाला चाट

लोकसत्ता प्रतिनिधी

अंबरनाथ : प्रस्तावित असलेल्या वाहनतळांचा प्रश्न मार्गी लावताना पालिका प्रशासनाला यश येताना दिसत नाही. मात्र त्याच वेळी कोणत्याही निविदेची वाट न पाहता अंबरनाथ पश्चिमेतील रेल्वे स्थानकाशेजारील वाहनतळावर काही व्यक्तींनी बनावट पावत्या छापून वाहनचालकांकडून बेकायदा वसुली सुरू केली आहे. टाळेबंदी शिथिल झाल्यापासून या ठिकाणी बेकायदा वसुली सुरू असून त्यातून पालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाल्याचे समोर आले आहे.

अंबरनाथ शहरात गेल्या काही वर्षांत वाहतूक व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. त्यावर उपाय म्हणून शहरातल्या पालिकेच्या अखत्यारीतील वाहनतळ सुरू करणे आवश्यक आहे. मात्र शहरातील वाहनतळांचा प्रश्न मार्गी लावण्यात अंबरनाथ नगरपालिकेला यश येताना दिसत नाही. त्यातच निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच शहरातील पश्चिमेला स्थानकाशेजारी असलेल्या भूखंडावर बेकायदा वाहनतळ वसुली सुरू झाल्याची बाब समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या वाहनतळाचा ताबा काही व्यक्तींनी घेतला आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका बडय़ा नेत्याच्या आशीर्वादाने हा प्रकार झाल्याची चर्चा आहे. येथे येणाऱ्या वाहनचालकांकडून प्रति वाहन १५ रुपयांची वसुली केली जाते. सुमारे ८०० ते एक हजार दुचाकींची क्षमता असलेले हे वाहनतळ प्रवाशांसाठी अगदी सोयीचे आहे. त्यामुळे सरासरी ८ ते १० हजार रुपयांची दररोजची वसुली या ठिकाणी होत असल्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे प्रतिमाह ६ ते ८ लाखांपर्यंतची वसुली या ठिकाणी होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अंबरनाथ नगरपालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या वाहनतळावर बेकायदा वसुली सुरू असल्याची कोणतीही माहिती पालिकेच्या वाहनतळ विभागाला नसल्याचे समोर आले आहे.

बेकायदा वसुलीची परंपरा

अंबरनाथ शहरात वाहनतळ घोटाळ्यांची परंपरा असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे. अंबरनाथ शहरात २०१५मध्ये वाहनतळाचे कंत्राट संपल्यानंतर काही व्यक्तींनी या वाहनतळाचा ताबा घेऊन लाखो रुपयांची वसुली केल्याचे २०१६मध्ये समोर आले होते. त्यानंतर पश्चिमेतील राज्य परिवहन विभागाच्या जागेवरही अशाच प्रकारे वसुली केली जात असल्याचेही दिसून आले होते, तर स्थानकाशेजारील स्वच्छतागृहावरही काही व्यक्तींनी अतिक्रमण करून बेकायदा वसुली केल्याचे दोन वर्षांपूर्वी समोर आले होते.

महापालिकेच्या जागेवर कोणत्याही निविदा, कार्यादेशाशिवाय वसुली सुरू असेल तर हे बेकायदा आहे. त्यावर कठोर कारवाई केली जाईल.

– डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका