सर्कस मैदान, मासळी बाजारातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचाही प्रशासनाचा निर्धार

लोकसत्ता प्रतिनिधी

अंबरनाथ : स्थानक परिसरातील कोंडी दिवसेंदिवस होत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत होता. अखेर अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी अतिक्रमणे तातडीने हटवण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानक परिसरात असलेले सर्कस मैदान, मासळी बाजार यांचा प्रलंबित प्रश्नही दिवाळीनंतर सोडवून नाटय़गृह उभारणीचे काम आणि नव्या इमारतीत मासळी बाजार सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाचे केंद्रही लवकरच सुरू केले जाणार आहे.

अंबरनाथ शहरातील स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोंडी वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागते आहे. रस्त्यांच्या कडेला वाढलेले अतिक्रमण, हातगाडय़ा, फेरीवाले यामुळे स्थानक परिसर कायम कोंडीत असतो. या कोंडीवर उपाय काढण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी गुरुवारी स्थानक परिसराचा आढावा घेतला. पश्चिम भागात असलेला मासळी बाजार अनेक दिवसांपासून स्थलांतरित होत नसल्याने येथील विकास आराखडय़ातील रस्त्याचे काम रखडले आहे. येथे मासळी बाजाराची नवी वास्तू दोन वर्षांपूर्वी तयार झाली. त्याचे लोकार्पण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. मात्र अस्तित्वात असलेले विक्रेते आणि बाजारातल्या वास्तूची क्षमता यात तफावत असल्याने बाजाराची वास्तू सुरू होऊ  शकली नव्हती. तेथील १८ मूळ विक्रेत्यांना आता बाजाराच्या नव्या वास्तूमध्ये तर उर्वरित १० विक्रेत्यांना वास्तू शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये व्यवस्था करून दिली जाणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी स्पष्ट केले आहे. हे विक्रेते हटल्यास विकास आराखडय़ातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यासोबतच सर्कस मैदानात लवकरच नाटय़गृहाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी येथील अतिक्रमणे हटवणे महत्त्वाचे असून त्यासाठी दिवाळीनंतर पावले उचलली जाणार आहेत.

निर्बीजीकरण लवकरच

शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना शहरातील भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण मात्र रखडलेले आहे. या निर्बीजीकरण केंद्राची पाहणी नुकतीच डॉ. प्रशांत रसाळ यांनी केली. या केंद्रातील शस्त्रक्रिया विभाग तातडीने सुरू करून निर्बीजीकरणाचे काम लवकरच सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.