हेमलकसा, आनंदवनाच्या पाहणीसह प्रकाश आमटेंशी संवाद

‘भारत माझा देश आहे.. सारे भारतीय माझे बांधव आहेत’ या प्रतिज्ञेतील सार जाणून घेण्यासाठी अंबरनाथ पंचकोषाधारित गुरुकुल या शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘मातृभूमी परिचय’ शिबिराच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्य़ास भेट देऊन तेथील आदिवासी बांधवांचे राहणीमान समजून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी या विद्यार्थ्यांनी हेमलकसा येथे जाऊन डॉ.प्रकाश आमटे यांच्याशी गप्पा मारल्याच शिवाय आनंदवनातील कार्यही पाहिले. यावेळी सोमनाथ प्रकल्पाची पाहाणी करून या विद्यार्थ्यांनी डॉ.अभय बंग व राणी बंग यांच्या शोधग्राम प्रकल्पातून उभे राहिलेले कार्यही अनुभवले.
अंबरनाथमधील भाऊसाहेब परांजपे विद्यालयाशी संलग्न असलेली पंचकोषाधारित गुरुकुल ही कानसई विभागातील शाळा दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मातृभूमी परिचय शिबिराचे आयोजन करत असते. आपल्या मातृभूमीचा परिचय हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून निघालेल्या या विद्यार्थ्यांनी १६ ते २३ नोव्हेंबर या एरव्ही नक्षलवादग्रस्त अशी ओळख असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्य़ाची ओळख करून घेतली.
या शिबिराच्या उद्देशाबद्दल सांगताना शाळेचे प्रमुख धनंजय खटावकर म्हणाले की,  ‘आपल्या गावाव्यतिरिक्त अन्य दूर असलेल्या गावातील नागरिक, ज्यांना दररोज म्हणण्यात येणाऱ्या प्रतिज्ञेत आपण बांधव म्हणून संबोधतो अशांची भेट घेण्यात यावी आणि यानिमित्ताने मूल्यशिक्षणाचे धडे मिळावेत म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात येते. या गावांमधील सरपंच, मुख्याध्यापक आदींकडून त्या ठिकाणाबद्दल मार्गदर्शन तसेच तेथील बोलीभाषेतील गाणे शिकण्याचा विद्यार्थ्यांकडून प्रयत्न करण्यात येतो.’ या उपक्रमाचा भाग म्हणून यंदा सातवीचे विद्यार्थी नक्षलवादाच्या पलीकडे वेगळी ओळख राखून असलेल्या गडचिरोली जिल्ह्य़ास भेट देण्यास गेले. यावेळी डॉ. प्रकाश आमटेंशी सातवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी दीड तास मनसोक्त गप्पा मारल्या.