कुळगाव-बदलापूर नगरपालिकेकडून ५० लाखांचा निधी मंजूर; ‘लोकसत्ता ठाणे’च्या वृत्ताची दखल

कुळगाव-बदलापूर नगरपालिका हद्दीतील राज्य शासनाच्या निधीतून सुरू झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम आता पालिका स्वत:च्या निधीतून करणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या पुढील निधीची वाट न बघता पालिकेने नागपूर व नाशिकच्या धर्तीवर हे स्मारक बांधून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी तब्बल ५० लाखांचा निधी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. तसेच येत्या १४ एप्रिलच्या आंबेडकर जयंतीपर्यंत हे काम पूर्ण केले जाईल. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही याच वेळी करण्यात येणार असून या पुतळ्यासाठीही सभेत ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आंबेडकर स्मारक रखडलेल्या अवस्थेत असल्याबद्दल ‘लोकसत्ता ठाणे’ने ५ डिसेंबरला वृत्त प्रकाशित केले होते.

बदलापूर पश्चिमेकडील सोनिवली येथे राज्य सरकारच्या दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत वैशिष्टय़पूर्ण अनुदानातून ५० लाख रुपयांचा निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून स्मारकाचा ढाचाही बांधून पूर्ण झाला होता. पुढील काम करण्यासाठी पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे निधीची मागणीही केली होती. मात्र शासनाने तीन वर्षांपासून निधीच दिला नव्हता. याबाबत ‘लोकसत्ता ठाणे’ने ५ डिसेंबरला वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे हे स्मारक पालिकेच्या निधीतून बांधण्याचा निर्णय पालिकेने आता घेतला आहे. १५ ऑक्टोबर २०१५ च्या सभेत या कामासाठी पालिकेने २५ लाखांचा निधी मंजूर केला होता. मात्र स्मारकाचे काम मोठे असल्याने यासाठी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत २६ लाखांचा अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे स्मारकाच्या कामासाठी आतापर्यंत ५१ लाखांचा निधी पालिकेने मंजूर केला असून येत्या १४ एप्रिलपर्यंत या स्मारकात पादचारी मार्ग, सपाटीकरण, सुशोभीकरण व अन्य सोयींची उभारणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे स्फूर्तिस्थळ असून त्याची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा सर्व राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींची आहे. त्यामुळे येत्या १४ एप्रिलपर्यंत आम्ही या भव्य स्मारकाची निर्मिती करणार आहोत, असे नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी सांगितले.

पुतळ्यासाठी ३० लाख

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठीही पालिकेने शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ३० लाखांचा निधी सर्वानुमते मंजूर केला आहे. पुतळा उभारण्यासाठी या वर्षीच फेब्रुवारीमध्ये पालिकेने ठराव केला होता. आता बदलापूर पश्चिमेकडील भगवती हॉस्पिटलसमोरील मोकळ्या जागेत हा पुतळा उभारण्याचे निश्चित झाले आहे. शासकीय मंजुऱ्यांचा पाठपुरावा करण्यासाठी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.