tn02उल्हास नदी, चिखलोली धरण, मध्य रेल्वेच्या मालकीचे अंबरनाथ येथील जीआयपी धरण या पाणीसाठय़ांच्या निसर्गदत्त देणग्या अंबरनाथ व बदलापूर शहरांना लाभल्या आहेत. त्यामुळे वरकरणी पाहता पाणीसाठय़ाची चणचण भासणार नाही, अशी परिस्थिती आहे; मात्र उपलब्ध पाण्याचा पुरवठा करणारी वितरण व्यवस्था जुनी असल्याने आणि वाढत्या नागरीकरणामुळे पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर ही मुंबईची उपनगरे सध्या येथील गृहप्रकल्पांमुळे चर्चेचा विषय बनली आहेत. मुंबईपासून दीड तास लोकल प्रवासाने दूर असलेल्या या उपनगरांमध्ये बहुतांश मुंबईकर स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे या बडय़ा शहरांच्या पुढे सांस्कृतिक चेहरा असलेली शहरे म्हणून अंबरनाथ व बदलापूरला राहण्यासाठी पसंती मिळत आहे. उल्हास नदी, चिखलोली धरण, मध्य रेल्वेच्या मालकीचे अंबरनाथ येथील जीआयपी धरण या पाणीसाठय़ांच्या निसर्गदत्त देणग्या या शहरांना लाभल्या आहेत. त्यामुळे वरकरणी पाहता पाणीसाठय़ाची चणचण भासणार नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र उपलब्ध पाण्याचा पुरवठा करणारी वितरण व्यवस्था जुनी असल्याने आणि वाढत्या नागरीकरणामुळे पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.
अंबरनाथ व बदलापूरमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या राज्य शासनाच्या संस्थेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. येथील नगरपालिकाकंडे पाणीपुरवठय़ाचे अधिकार व यंत्रणा नाहीत. बदलापूरला उल्हास नदीवर बसविलेल्या बॅरेज धरणाकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठय़ासाठी नुकत्याच सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत बदलापुरात दोन पाण्याच्या टाक्याही बांधण्यात आल्या आहेत. यासाठी वापरण्यात येणारी बहुतेक यंत्रणा ही ब्रिटिशकालीन आहे. २००५ मध्ये आलेल्या पुरानंतर या यंत्रणेत बदल झाले. मात्र बदलापूर शहराच्या पश्चिमेकडे ब्रिटिशांनी उल्हासनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेल्या टाक्यांमधून बदलापूरच्या रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यात येतो, तर अंबरनाथ शहराला येथील चिखलोली धरणामधून पाणीपुरवठा करण्यात येतो. दोन्ही शहरांसाठी उल्हास नदीतून ९० दशलक्ष लिटर्स, चिखलोली धरणातून ६ दशलक्ष लिटर्स आणि एमआयडीसीतून ९ दशलक्ष लिटर्स पाणी प्रतिदिन पुरविण्यात येते. या दोन्ही शहरांची लोकसंख्या सध्या सव्वापाच लाखांच्या घरात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सर्वेक्षणाप्रमाणे बदलापूरला २८ दशलक्ष लिटर्स पाण्याची आवश्यकता आहे, पण नागरिकांकडून होणारा अर्निबध वापर आणि गळतीमुळे शहराला ४० दशलक्ष लिटर्स पाणी लागत आहे. हीच अवस्था अंबरनाथची असून प्राधिकरणाच्या सर्वेक्षणाप्रमाणे अंबरनाथकरांना ३८ दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज असून पाणीबचत न झाल्याने ५४ दशलक्ष लिटर्सइतके पाणी पुरवावे लागते. तसेच या दोन्ही शहरांत रस्ते काँक्रिटीकरणाची, डांबरीकरणाची, भुयारी गटार योजनेची कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. शहरात ठिकठिकाणी नव्या गृहप्रकल्पांचे बांधकाम होत आहे, तर रिलायन्स कंपनीमार्फत केबल टाकण्याची, विद्युत वितरण कंपनी, टेलिफोन लाइन आदींच्या दुरुस्तीसाठी हमखास खोदकाम सुरू असते. शहरातील कोणता ना कोणता भाग हा खोदकामाने बाधित होत असतो. याचा मोठा फटका येथील पाणीपुरवठा व्यवस्थेला बसत आहे.
जलवाहिन्या फुटून पाणी वाया जाते. तसेच वाहिन्यांमध्ये माती-कचरा जाऊन पाणीपुरवठा दूषित होतो. त्यामुळे काविळीसारखे आजार उद्भवतात. तसेच प्राधिकरणाच्या दोन्ही शहरांतील पाण्याच्या वाहिन्या या जुन्या असल्याने वारंवार फुटण्याच्या घटना घडतात. त्यामुळे या खोदकाम व पाईप फुटीच्या घटनांमुळे यापूर्वी २० टक्के होणारी पाणीगळती आता ३० टक्क्यांच्या वर गेली आहे. याहून गंभीर बाब म्हणजे ज्या नगर परिषदांच्या कामांमुळे हे नुकसान होत आहे त्या दोन्ही शहरांच्या नगर परिषदांचा त्यांच्याकडून तुटलेल्या जलवाहिन्या जोडणीसाठी कोणतेही सहकार्य मिळत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. रोज वाढत जाणाऱ्या या जलवाहिनी फुटण्याच्या प्रकारांमुळे शहरातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. तसेच ही पाणीगळती वाढल्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १५ जुलै २०१५ पर्यंत पाणीसाठा टिकवण्यासाठी, दर सोमवारी अंबरनाथ व बदलापूरमध्ये पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून एकूण १४ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
 सध्या उन्हाळा वाढू लागल्याने पाण्याची मागणी वाढणार आहे. त्याच वेळी अधिक पाणीकपातीला सामोरे जाण्याचे दिव्य अंबरनाथ व बदलापूरकरांच्या नशिबी येण्याची शक्यता आहे. या दोन्ही शहरांमधील नागरिक हा मुंबईकडे जाणारा चाकरमानी वर्ग आहे. त्यामुळे रोजच्या रोज प्राधिकरणाच्या कार्यालयात पाण्याच्या तक्रारीसाठी खेटे घालणे परवडत नसल्याने येथील सोसायटय़ा या पाण्याच्या टँकरसाठी धाव घेतात. त्यामुळे या टॅँकरमाफियांचे चांगलेच फावले असून एकंदर पाणीगळतीमुळे या माफियांची सध्या चलती सुरू झाली आहे. तसेच या पाणीगळतीच्या घटनांचा प्राधिकरणावर ताण आहे. त्यात कामाच्या तुलनेत कर्मचारी अपुरे आहेत, अशी माहिती प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली. तसेच सगळ्यात गंभीर मुद्दा हा देणेकऱ्यांचा झाला असून बदलापुरातील देयकांची थकबाकी १० कोटींच्या वर आहे, तर अंबरनाथमधील थकबाकी ही २० कोटींच्या वर आहे. ही थकबाकी देयके  न भरल्यामुळे निर्माण होणाऱ्या व्याजामुळे तयार झाली आहे. त्यामुळे ३१ जुलै २०१५ पर्यंत शासनाच्या निर्भय योजनेचा लाभ घेऊन व्याज वगळून उर्वरित रक्कम भरण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. तीस कोटींची वसुली, संख्येने कमी असलेल्या कर्मचाऱ्यांवर वाढलेला कामाचा ताण, पाणीपुरवठय़ाची जुनाट व्यवस्था, नागरिकांकडून न होणारी बचत, शासनाकडून येणाऱ्या निधीला पाहावी लागणारी वाट या समस्यांमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जर्जर झाले असून यात येत्या तीन ते चार वर्षांच्या कालावधीत बदल न झाल्यास या दोन्ही शहरांची व्यवस्था निश्चितच कोलमडून पडणार यात तिळमात्रही शंका नाही.
संकेत सबनीस

मतदार पाणी दाखवणार?
अंबरनाथ व बदलापूरच्या पालिका निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना शहरात बिकट होत जाणारी पाणीसमस्या कळीचा मुद्दा ठरणार आहे. कारण शहरांमधील पाणीपुरवठय़ाची यंत्रणा ही पालिकांच्या कामांमुळे होणारे खोदकाम, वाढते नागरीकरण याने कोलमडत असल्याचे माहीत असूनही येथील लोकप्रतिनिधी गप्प आहेत. तसेच या खोदकाम कराव्या लागणाऱ्या विकासकामांचे ठेकेदार व वाढत्या नागरीकरणास हातभार लावणारे बांधकाम व्यावसायिक हे येथील लोकप्रतिनिधी व त्यांचे हस्तकच असल्याने ते या गंभीर प्रश्नावर गप्प असल्याचे दिसत आहे. परंतु नागरिकांना या मुद्दय़ांशी देणे-घेणे नसून त्यांना केवळ रोज पाणी मिळावे हीच अपेक्षा आहे. त्यामुळे येथील नागरिक पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नावर मतांचा जोगवा मागायला येणाऱ्या उमेदवारांना झोडपणार, हे निश्चितच.