अंबरनाथ येथील नृत्यकलांजली या संस्थेत भरतनाटय़म शिकणाऱ्या २१ नर्तकांनी नुकतेच हैदराबाद येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होत तेथील रसिकांची मने जिंकली. नव्याने स्थापन झालेल्या तेलंगणा राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त भरविण्यात आलेल्या या महोत्सवात देशभरातील नऊ राज्यांतील कलावंतांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी अंबरनाथच्या नर्तकांना मिळाली. तेथील रवींद्र भारती सभागृहात सुप्रसिद्ध नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक रमेश कोळी यांच्या नेतृत्वाखाली नर्तकांनी अष्टलक्ष्मी, रामायण, शिवस्तुती या नृत्यनाटिका तसेच काही एकल आणि समूह नृत्ये सादर केली. रसिकांनी त्यांच्या सादरीकरणाला दिलखुलास दाद दिली. रसिकांचा उदंड प्रतिसाद पाहून त्यांना पुन्हा काही नृत्य प्रकार सादर करावे लागले. या वन्स मोअरबरोबरच महाराष्ट्रीय लोकनृत्य सादर करण्याची विनंतीही आयोजकांनी या चमूला केली.
मात्र परतीची तिकिटे आधीच काढली असल्याने त्यांना इच्छा असूनही त्यांची फर्माईश पूर्ण करता आली नाही. सन्मानचिन्हे देऊन कलावंतांचा सन्मान करण्यात आला. चार दिवस तेलंगणा शासनाचे पाहुणे म्हणून अंबरनाथमधील या कलावंतांनी हैदराबाद शहराची सैर केली.