अंबरनाथ पूर्वेकडील अतिरिक्त महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या जमिनीवर बांधण्यात आलेल्या अनधिकृत चाळी, शेड, व्यावसायिक गाळे आदींवर एमआयडीसीने थेट कारवाई करत ही बांधकामे जमीनदोस्त केली आहेत.
अंबरनाथ-बदलापूरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामांमध्ये वाढ झाली असून या बांधकामांबद्दल तक्रारीही वाढल्या आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या जमिनीवरही अनधिकृत बांधकामे वाढल्याचे एमआयडीसीच्या निदर्शनास आले होते. अखेर बोनोली गाव व जांभिवली परिसरातील या बांधकामांवर मोठय़ा पोलीस बंदोबस्तात एमआयडीसीने शुक्रवारी दुपारी जेसीबीच्या साहाय्याने ४० बांधकामे जमीनदोस्त केली. ग्रामस्थांनी याला विरोध केला असता पोलिसांनी त्यांना रोखल्याने कारवाई यशस्वीरीत्या पार पडली. या वेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आर. व्ही. केंद्रे व उप अभियंता हरिश्चंद्र पतंगे उपस्थित होते. कारवाई केलेल्या जमिनीवर कुंपण घालण्यात येणार असून ती लवकरच उद्योगांना हस्तांतरित करण्याचा प्रयत्न राहील असे पतंगे यांनी सांगितले.