News Flash

अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्यालयाचे प्रवेशद्वार, स्कायवॉक धोकादायक

अंबरनाथ नगरपालिका मुख्यालयाच्या नव्या इमारतीचे काम सध्याच्या जुन्या इमारतीच्या मागच्या बाजूस सुरू आहे.

अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्यालयाचे प्रवेशद्वार, स्कायवॉक धोकादायक

नागरिक, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास; अपघात होण्याची भीती

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका मुख्यालयाच्या नव्या इमारतीचे काम सध्याच्या जुन्या इमारतीच्या मागच्या बाजूस सुरू आहे. मात्र असे असले तरी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरचा स्लॅबचा भाग धोकादायक अवस्थेत आहे. त्यामुळे प्रवेशद्वारामधून प्रवेश करणाऱ्या नागरिकांना, कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

पालिका मुख्यालयाबाहेर असलेल्या स्कायवॉकचाही खालच्या बाजूचा पत्रा धोकादायक अवस्थेत लटकलेला असल्याने कोणत्याही क्षणी तो पडण्याची भीती आहे. त्यामुळे रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांनाही भीतीच्या छायेत वावरावे लागते आहे.

अ वर्ग नगरपालिकेत येणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या वास्तूचे अनावरण येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीच्या मागच्या बाजूस नवी इमारत उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र सध्या ज्या जुन्या इमारतीतून पालिकेचा कारभार हाकला जातो आहे. त्या इमारतीची काही अंशी पडझड होऊ लागली आहे. काही महिन्यांपूर्वी या पालिकेच्या मुख्यालयातील अग्निशमन दलाच्या विभागाचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे नव्याने उभारण्यात आलेल्या अग्निशमन कार्यालयात हा विभाग तातडीने स्थलांतरित करण्यात आला.

आता उर्वरित पालिका मुख्यालयाच्या इमारतीचाही काही भाग धोकादायक अवस्थेत आहे. नगरपालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे मुख्य छत ज्या ठिकाणी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची वाहने उभी राहतात. तो भाग धोकादायक स्थितीत आहे. याच्या छताचे प्लास्टर पडण्याच्या स्थितीत आहे. तर स्लॅबच्या सळया दिसत आहेत. या भागाला विविध ठिकाणी तडे गेले आहेत. याच प्रवेशद्वारातून दररोज मोठय़ा संख्येने नागरिक, कर्मचारी ये-जा करत असतात. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. तर पालिका मुख्यालयाच्या समोर असलेल्या स्कायवॉकचा बहुतांश भाग आता धोकादायक बनला आहे. स्कायवॉकच्या खालच्या बाजूला असलेले संरक्षण पत्रे आता लोंबकळू लागले आहेत. वाऱ्याचा वेग वाढल्यास हे पत्रे हलू लागतात. अंबरनाथ रेल्वे स्थानकाकडे जाणारा हा मार्ग महत्त्वाचा आहे.

नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर असलेल्या धोकादायक भागाचे पाडकाम केले जाणार असून त्याबाबत संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

– डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2021 1:39 am

Web Title: ambernath municipal headquarters entrance skywalk dangerous ssh 93
Next Stories
1 अंबरनाथमध्ये अपघातात चौघांचा मृत्यू
2 पावसामुळे वाहतुकीचा बोऱ्या
3 एसटीचे कल्याण आगार बाजार समितीच्या आवारात?
Just Now!
X