अंबरनाथमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा पंचायत समितीवर कब्जा; भाजपला अवघी एक जागा

गेल्या काही वर्षांपासून अंबरनाथ ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व विधानसभा निवडणुकीनंतर कमी झाल्यानंतर आमदार आणि खासदारांच्या माध्यमातून भाजपची ताकद वाढली होती. मात्र नुकत्याच झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे.

मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश करत राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली होती. मात्र यंदाच्या जिल्हा परिषद आणि अंबरनाथ पंचायत समिती निवडणूकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीने भाजपला सपशेल पराभूत केले आहे. जिल्हा परिषदेच्या नेवाळी गटात आणि पंचायत समितीच्या वांगणी गणात भाजपचे अवघे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरित सर्व जागी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी जिंकल्या आहेत. त्यामुळे अंबरनाथ पंचायत समितीत शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. पंचायत समितीतील आठ जागांपैकी पाच ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात चरगाव, चोण, नेवाळी, चामटोली आणि काराव या गणांचा समावेश आहे. नाऱ्हेण आणि वाडी गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर वांगणी गणात भाजपचा उमेदवार विजयी झाला असून नेवाळी जिल्हा परिषदेची एकमेव जागा भाजपने राखली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आलेल्या उमेदरावांना उमेदवारी देणे, निष्ठावंतांना डावलणे , नेवाळी आंदोलनाचा फटकाही भाजपला बसल्याचे बोलले जात आहे.तसेच चरगाव या किसन कथोरे यांच्या परंपरागत मतदार संघातही शिवसेनेने मुसंडी मारली आहे.

मुरबाडचा गड भाजपकडे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कडवे आव्हान आणि त्यांना मिळालेली शिवसेनेची साथ यामुळे मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद निवडीत भाजपला फटका बसेल, अशी शक्यता होती. मात्र असे असतानाही भाजपने जिल्हा परिषदेच्या आठपैकी चार आणि पंचायत समितीच्या १६ पैकी १० जागा जिंकत आपला गड कायम राखला आहे.

मुरबाडचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांनी भाजपची वाट धरल्यानंतर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घरघर लागली होती. नगर पंचायत निवडणुकीत भाजपने सत्ता राखल्याने पक्षाचा विश्वास वाढला होता. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप समोर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीचे कडवे आव्हान होते. तरीही जिल्हा परिषदेच्या आठपैकी चार जागा जिंकत भाजपने आपला गड कायम राखला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागांवर तर शिवसेनेला मात्र एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटीराम पवार यांचा कस लागला होता. मात्र मुरबाड नगर पंचायतीप्रमाणे मुरबाड पंचायत समितीत अस्तित्व कायम ठेवण्यात त्यांना यश आले आहे. पंचायत समितीच्या एकूण १६ जागांपैकी १० जागा भाजपने जिंकल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला पाच तर शिवसेनेच्या वाटय़ाला अवघी एक जागा आली आहे.