गेल्या अनेक महिन्यांपासून अंधारमय झालेल्या अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉक अखेर प्रकाशमान होणार आहे. वीज बिल न भरल्याने खंडित करण्यात आलेला येथील विजेचा पुरवठा पूर्ववत होणार आहे, अशी माहिती नगर परिषदेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. ठाणे ‘लोकसत्ता’ने यासंबंधीचे वृत्त प्रकाशित करताच अंबरनाथ नगर परिषदेने थकीत वीज बिलाचा भरणा केला आहे. त्यामुळे विजेचा पुरवठा येत्या दोन दिवसांत पूर्ववत होणार आहे.
वाहतूक कोंडी आणि गर्दीतून पादचाऱ्यांना वाट काढता यावी यासाठी रेल्वे स्थानकांबाहेर स्कायवॉकची उभारणी करण्यात आली. मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर उभारण्यात आलेल्या स्कायवॉकच्या देखभालीची जबाबदारी नेमकी कुणी उचलायची यावरून गेल्या काही दिवसांपासून नगरपालिका आणि महानगर विकास प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एकमत होत नव्हते. त्यामुळे या स्कायवॉकवरील वीज बिलाचा भरणा कुणी करायचा, हा वादही रंगला होता.
काही महिन्यांपासून विजेचे बिल भरले जात नसल्यामुळे मंडळाने वीज पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे नागरिकांना अनेक महिने अंधारातून प्रवास करावा लागत होता. रात्रीच्या वेळी अंधारामुळे स्कायवॉकवर सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता. या स्कायवॉकची विजेची थकबाकी एकूण ३४ हजार ३५० रुपये असून शेवटचा भरणा एमएमआरडीएकडून नोव्हेंबर महिन्यात करण्यात आला होता. यावर एमएमआरडीकडून स्कायवॉक पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पालिकेकडे हस्तांतरण झाल्याची कोणतीही माहिती नसल्याचे सांगत हस्तांतरण प्रक्रिया पूर्णच झाली नसल्याचे पालिकेचे अधिकारी सांगत होते.
दरम्यान, हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच जबाबदारी म्हणून थकीत वीज बिलाचा भरणा पालिकेकडून करण्यात आला आहे. यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली असून येत्या काळात स्कायवॉकच्या स्वच्छतेची, सुरक्षेची आणि एकंदरीत जबाबदारी नगरपालिकेवर येणार आहे.