News Flash

आठवडय़ाची मुलाखत : सरकारी जागांवरील सर्व अतिक्रमणे हटविणार

अंबरनाथ तालुक्यात गेल्या दोन महिन्यांच्या काळात अतिक्रमणांविरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली.

| July 7, 2015 04:34 am

अमित सानप -अंबरनाथ-  तहसीलदार
अंबरनाथ तालुक्यात गेल्या दोन महिन्यांच्या काळात अतिक्रमणांविरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली. त्यातही अंबरनाथ शहरी भागात तहसीलदार अमित सानप यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या मोहिमेत प्रशासनाने तब्बल १३०० च्या आसपास अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणे धडक कारवाईत पाडण्याची कामगिरी अंबरनाथ तालुक्याच्या इतिहासात प्रथमच झाली. अवैध वाळू तसेच रेती व्यावसायिकांविरुद्धही कारवाई करण्यात आली. या कारवाईमागची प्रशासनाची भूमिका तसेच पुढील वाटचालीबाबत तहसीलदार अमित सानप यांची भूमिका जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता ठाणे’ने त्यांच्याशी केलेली बातचीत..
’गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत अंबरनाथ शहर भागात अतिक्रमण हटविण्याच्या कारवाई मागची भूमिका व कारणे कोणती?
गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत अंबरनाथ शहर भागात अनेक अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. यात मुख्यत्वे कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर असणारी एक हजार अतिक्रमणे पाडण्यात आली आहेत. या सर्वात मोठय़ा कारवाईबरोबरच शहरातील इतरही अनेक सरकारी जागांवर असणारी अतिक्रमणे आम्ही पाडली आहेत. शहर विकासात अडथळा ठरणाऱ्या अवैध बांधकामांना पाडून विकास प्रक्रिया पूर्ण करणे ही यामागची भूमिका आहे. त्यासाठीच ही कारवाई करण्यात आली.
’ कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावरील कारवाई कशा रीतीने पार पाडली व विरोध झाला का?
कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावरील एक हजार अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोठी कारवाई पार पाडताना महसूल विभागाच्या बरोबरीनेच जिल्हा प्रशासन, अंबरनाथ नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आदींची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यामुळेच ही कारवाई बिनदिक्कत पार पडली. तसेच, जवळपास ५०० च्या आसपास पोलीस व अन्य कर्मचारी असल्याने विरोध न होता ही कारवाई करता आली. या कारवाईने कल्याण-बदलापूर राज्य महामार्ग विकसित होण्याचा मार्ग मोकळा करणे केवळ हेच उद्दिष्ट प्रशासनाने डोळ्यापुढे ठेवले होते.
’ कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर पुन्हा अतिक्रमणे उभी राहत आहेत, त्यांच्यावर कारवाई कधी?
कल्याण-बदलापूर महामार्गावर सर्वच अतिक्रमणे पाडली आहेत. परंतु, काही नवी अतिक्रमणे पुन्हा उभी राहत असतील तर, त्याबाबत अंबरनाथ पालिकेला पत्रव्यवहार करणार असून त्यांना यासाठी दोन भरारी पथकांची नेमणूक करण्याची सूचना करण्यात येणार आहे. या पथकांना अतिक्रमणांचा दररोज आढावा घेण्यास सांगण्यात येणार असून नवी अतिक्रमणे दिसल्यास तात्काळ पाडण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.
’अंबरनाथमधील सरकारी जमिनींवरील अतिक्रमणे कधी पाडणार?
अंबरनाथ तालुक्यात अशा कारवाईला आम्ही याआधीच सुरुवात केली असून अंबरनाथमध्ये बारकूपाडा, कानसई विभाग तर बदलापुरात एरंजाड, वांगणी, डोणे आदी भागांत सरकारी जमिनींवरील जवळपास २५० अतिक्रमणे ही गेल्या काही महिन्यांत आम्ही पाडली आहेत. तसेच गावरान जमिनींवर कारवाई ही ग्रामपंचायतींनी करायची असते. याबाबत आमचे ग्रामपंचायतींना निश्चित सहकार्य असते. तसेच, महसूल विभागाच्या जागांवर असणारी अतिक्रमणे पाडण्यास सुरुवात केली असून येत्या काही दिवसांत अजून काही अतिक्रमणे आम्ही पाडणार आहोत.
’ तालुक्यातील अवैध रेती व्यवसायावर काय कारवाई करणार आहात?
अंबरनाथ तालुक्यात अवैध रेती उपसा व चोरटी वाहतूक यावर आमची कारवाई सतत सुरू आहे.  गेल्या वर्षी (२०१४) आम्ही रेतीच्या जवळपास १६२ गाडय़ा पकडल्या असून तब्बल ११ लाख रुपये दंड वसूल केला आहे. या वर्षी आता आम्ही पुन्हा या कारवाईवर लक्ष केंद्रित करणार असून बदलापूरमधून वाहणाऱ्या उल्हास नदीवर जास्त लक्ष देणार आहोत. येथे अनुचित प्रकार आढळल्यास आम्ही संबंधितांवर तात्काळ कारवाई करणार आहोत.
’ अंबरनाथ-बदलापुरात मोठय़ा प्रमाणात गृहप्रकल्पांची कामे सुरू असून येथे रेतीच्या वापरावर काय कारवाई करणार आहात?
अंबरनाथ व विशेषत: बदलापूरमध्ये इमारतींची बांधकामे मोठय़ा प्रमाणावर सुरू असून येथे येणारी रेती ही मुख्यत्वे राज्याच्या अन्य भागांतून येते. तसेच ही रेती घेऊन येणाऱ्या गाडय़ा या शहरात रात्री तीननंतर प्रवेश करतात. तरीही, आमच्या पथकांचे त्यांच्यावर लक्ष असून आम्ही रात्रीही या गाडय़ांवर कारवाई करतो. बदलापुरातील आंबेशिव परिसरात एक बोट या रेती वाहतुकीसाठी वापरण्यात आल्याचे समजताच आम्ही त्या बोटीवर कारवाई करत ती निकामी केली. परंतु, बांधकामे जास्त असल्याने आम्ही रात्री या चोरटय़ा रेतीवर जास्त लक्ष देणार आहोत.
’कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीची कामे कुठवर?
शासनाच्या सर्व योजनांवर काम सुरू असून त्यात मुख्यत्वे संजय गांधी योजनेची कामे सुरू आहेत. यात सर्वच लाभार्थ्यांना आम्ही लाभ मिळवून देणार आहोत. यासाठी नुकतीच एक बैठक झाली असून १२० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. तसेच, अन्य योजनांची कामेही प्रगतिपथावर असून या योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ देण्यात येत आहे.
’ संगणकीकरणात कितपत प्रगती झाली आहे?
संगणकीकरण या विषयावर आमचे काम सुरू असून यात मुख्यत्वे सात-बाराचा उतारा संगणकीकरण मोहीम आमची सध्या सुरू आहे. या मोहिमेंतर्गत सर्वच सात-बाराचे उतारे संगणकीकृत करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात १४,५०० शिधा वाटप पत्रिकाधारकांचे आधार कार्ड क्रमांक गोळा करण्याचे कार्य सुरू आहे. या आधार कार्ड क्रमांकांची नोंदणी करण्यात येणार असून भविष्यात या आधार कार्डधारकांना बायोमेट्रिक कार्ड देण्याचा शासनाचा मानस आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2015 4:34 am

Web Title: ambernath tahsildar amit sanap interview
Next Stories
1 माणकोली उड्डाणपुलाला सप्टेंबरचा मुहूर्त!
2 पालिकेची पत पाण्यात!
3 माळशेजच्या घाटात १३ नवे धबधबे
Just Now!
X