दूषित पाण्यामुळे चिखलोलीतून होणारा पाणीपुरवठा बंद

अंबरनाथ: शहराच्या पूर्वेतील बहुतांश भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणातून दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद केला आहे. धरणातील या पाण्याचा दर्जा तपासून पाणीपुरवठय़ाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, या प्रकारामुळे ऐन दिवाळीत अंबरनाथ पूर्वेतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

गेल्या महिन्यात चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र धरणातून दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर दररोज मोर्चे येत होते. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप अशा सर्व पक्षांनी प्राधिकरणाच्या कारभारावर आक्षेप घेतल्याने अखेर सोमवारपासून जीवन प्राधिकरणाने चिखलोली धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच पाणीपुरवठय़ाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र दशोरे यांनी दिली आहे. या काळात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी घेतले जाणार असून त्यामुळे पूर्वेतील भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा होईल, असेही दशोरे यांनी स्पष्ट केले आहे.

शुद्ध पाण्याचा दिलासा

चिखलोली धरणातून मिळणारे पाणी हे दररोज मिळत असले तरी ते दूषित असल्याने ते शुद्ध करण्यात नागरिकांना मोठा त्रास होत होता. दूषित पाण्याची तीव्रता इतकी होती की अनेकांच्या घरातील जलशुद्धीकरण यंत्रे बिघडली. त्याचा शारीरिक त्रासही अनेकांना सहन करावा लागला. त्यामुळे हा त्रास आता कमी होणार आहे. एक दिवसाआड पाणी मिळणार असले तरी ते शुद्ध असेल. किमान शुद्ध पाण्याचा दिलासा तरी मिळाला, अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.