महापालिका-पोलिसांचा संयुक्त उपक्रम; वेगळ्या मार्गिकेचा विचार

रुग्णवाहिकेस रस्ता द्यावा आणि रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत करता यावी यासाठी ठाणे महापालिका आणि ठाणे पोलिसांनी संयुक्तपणे कार्यक्रम हाती घेतला आहे. राधी डिझास्टर अ‍ॅण्ड एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या हस्ते बुधवारी पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने शहरातील विविध भागांमध्ये रुग्णवाहिकांसाठी खास वाहनतळांची व्यवस्था उभी केली असून नव्याने तयार करण्यात येणाऱ्या रस्ते प्रकल्पात खास मार्गिका ठेवता येईल का याचीही चाचपणी केली जात आहे.

या वेळी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, उपमहापौर राजेंद्र साप्ते, स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते संजय भोईर, भाजपचे गटनेते संजय वाघुले, काँग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर, नगरसेवक दशरथ पालांडे तसेच अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, उपआयुक्त संजय निपाणे, उपआयुक्त संदीप माळवी, मनीष जोशी, वैदय़कीय आरोग्य अधिकारी आर.टी. केंद्रे, वाहतूक शाखेचे सहा. पोलीस आयुक्त मठाधिपती, राधी डिझास्टर अ‍ॅण्ड एज्युकेशन फाऊंडेशन संचालिका डॉ. रीता सावला आदी मान्यवर उपस्थित होते.

ठाणे पोलिसांनी रुग्णवाहिकांचा प्रवास कोंडीमुक्त व्हावा यासाठी यापूर्वीच एका योजनेची आखणी केली आहे. एखादा रुग्ण गंभीर अवस्थेत असल्यास त्याच्या नातेवाईकांनी ठाणे पोलिसांशी संपर्क साधल्यास रुग्णास घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी खास मार्गिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून सुरू केला आहे. यास हातभार लागावा यासाठी महापालिकेनेही शहरातील विविध ठिकाणी रुग्णवाहिका उभ्या करण्यासाठी तात्पुरते वाहनतळ तयार केले आहे. शिवाजी मैदान, नितीन चौक, धर्मवीर नाका ते तीन हात नाका, सव्‍‌र्हिस रोड, साकेत कॉम्प्लेक्स, कापूरबावडी सर्कल उड्डाणपुलाखाली, आर मॉल मानपाडा, गणेश घाट (चिमाजी चौक), गौतमी हौ. सोसायटी, मुंब्रा पोलीस स्टेशन, जैन मंदिरजवळ आणि खारेगाव टोलनाका आदी ठिकाणी खास पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती संजीव जयस्वाल यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सहकार्य मिळत असल्याने रुग्णांचे प्राण वाचू शकतील, असा दावा  परमबीर सिंग यांनी केला.