केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या यादीत ठाणे जिल्ह्य़ातील नवी मुंबई शहराने देशात तिसरा, तर ठाणे शहराने १४ वा क्रमांक पटकाविला आहे. या दोन्ही शहरांनी राज्यात अनुक्रमे पहिला आणि तिसरा क्रमांक मिळविला आहे. ठाणे शहर गेल्या वर्षी देशात ५७ व्या स्थानावर होते. गेल्या वर्षभरात हा दर्जा सुधारावा यासाठी महापालिकेने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून स्वच्छता उपक्रमाच्या आघाडीवर मोठी झेप घेतली आहे.

यंदा १० लाख लोकसंख्येच्या आतील शहरांची वेगळी यादी जाहीर करण्यात आली असून त्यानुसार अंबरनाथला १८, मीरा-भाईंदरला १९, भिवंडीला २६, कुळगाव-बदलापूरला ४७ आणि उल्हासनगरला ९४ वे स्थान मिळाले असून त्यामुळे कमी लोकसंख्येच्या यादीतही या शहरांना पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळविता आलेले नसल्याचे चित्र आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नगरविकास विभागामार्फत दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात येते. त्यामध्ये देशभरातील शहरांमधील स्वच्छतेची केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात येते. त्यानुसार केंद्र शासन शहरांची स्वच्छतेतील क्रमवारी निश्चित करून ही यादी जाहीर करते. या स्वच्छ सर्वेक्षणात २०१८ मध्ये ठाणे शहराने ४० वे स्थान पटकावले होते, तर २०१९ मध्ये ५७ व्या स्थानावर पोहोचल्यामुळे ठाणे शहराची स्वच्छतेत मोठी घसरण झाली होती. यंदा महापालिकने स्वच्छ शहरांच्या यादीत बरीच सुधारणा केली असून गेल्या वर्षीच्या ५७ व्या स्थानावरून थेट १४ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

कल्याण-डोंबिवलीची घसरण, अंबरनाथची सुधारणा

स्वच्छता यादीत कल्याण-डोंबिवलीने यंदा २२ वा क्रमांक पटकाविला आहे. कल्याण-डोंबिवली शहराचा गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणाच्या यादीत १७ वा क्रमांक आला होता. यंदा त्यामध्ये घसरण होऊन शहर २२ व्या स्थानावर पोहोचले आहे. अंबरनाथ नगरपालिकेने देशात १८ वा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी अंबरनाथ ३० व्या क्रमांकावर होते, तर राज्यात अंबरनाथ शहराने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

गेल्या वर्षभरात शहर स्वच्छतेच्या आघाडीवर महापालिकेने केलेल्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश मिळाल्याचे हे द्योतक आहे. ठाणे महापालिका हद्दीचा आवाका आणि लोकसंख्या विचारात घेतली तर शहर स्वच्छतेसाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. या वर्षी नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

– अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, घनकचरा विभाग, ठाणे महापालिका