गुलजार यांच्या कथांवर फाळणीच्या वेदनेचा प्रभाव आहे. फाळणीतील हिंसेकडे मानवी अंगाने पाहण्याची वेगळी दृष्टी त्यांच्याकडे आहे. आकाराने छोटय़ा असलेल्या कथांमधून त्यांनी मोठा आशय आपल्यापुढे सादर केला. शिवाय चित्रपटकार असल्याने त्यांच्या कथेची शैली चित्रदर्शी आहे. रोजच्या अनुभवाला साहित्यिक मूल्य प्राप्त करून देण्याची प्रतिभा त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच गुलजार हे एक अद्भुत रसायन आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी केले.

उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयाच्या वतीने गुलजार यांच्या साहित्यकृतींवर आधारित दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद झाली. परिषदेच्या उद्घाटन समारंभाला प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आणि पत्रकार विश्वनाथ सचदेव यांच्यासह महाविद्यालयाच्या प्राचार्या पद्मा देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात नितीन देसाई यांनी गुलजार यांच्यासोबतच्या चित्रपटांच्या अनुभवांचे कथन केले. गुलजारांना निसर्गातील कलात्मकतेचा मोठा ओढा होता. ‘माचीस’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मनालीत असताना त्यांचा निसर्गाच्या प्रत्येक गुणाकडे आणि रंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देसाई यांनी सांगितला.
सचदेव यांनी गुलजार यांचे विविध पैलू उलगडण्याचे प्रयत्न केले. परिषदेच्या दुसऱ्या सत्रात डॉ. चरणजितसिंग कौर यांनी गुलजार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांच्यातील एक समानधागा उलगडण्याचा प्रयत्न केला. गुलजार आणि तेंडुलकरांनी माणसाच्या मनातील हिंस्रतेचा शोध वेगळ्या पद्धतीने घेतला. हेच या दोघांमधील साम्य आहे. यावर अधिक संशोधन करण्याची गरज कौर यांनी व्यक्त केली. अंबरीश मिश्र यांनी गुलजार यांच्या ‘देवडी’ कथासंग्रहातील कथालेखनाचे विश्लेषण केले. त्यानंतरच्या सत्रात वाडा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. कैलाश जोशी यांनी गुलजार यांच्या ललित गद्यांचे रसग्रहण विद्यार्थ्यांना करून दिले.
परिषदेच्या पहिल्या दिवसाची सांगता विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या त्यांच्या कविता आणि गीतांच्या कार्यक्रमाने झाली. या वेळी सचिन मुळे, जनार्दन धात्रक, पीयूष मोहरोलीया, ऋषाली या वेळी या गायक कलाकारांनी या गीतकाराने लिहिलेली १४ गाणी सादर केली.
परिषदेची दुसऱ्या दिवशीही विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींनी गर्दी केली होती. पहिल्या सत्रात प्राध्यापकांनी गुलजार यांच्याविषयचीच्या १६ संशोधनपर पत्रकांचे वाचन केले. तर मृदुला दाढे-जोशी आणि चंद्रकांत मिसाळ यांनी त्यांच्यातील गीतकार उलगडून दाखवला.
गुलजार यांच्या गाण्याचे सामथ्र्य दाखविताना कविता आणि गीते यांच्यातील अंतर कुठे संपते हेच कळत नाही, असे दाढे-जोशी यांनी स्पष्ट केले, तर डॉ. चंद्रकांत मिसाळ यांनी गुलजार यांचे अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न केला.