पोखरणमधील क्रीडासंकुलाचे एप्रिलमध्ये लोकार्पण

ठाणे : ठाणे येथील पोखरण परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे इनडोअर जिम्नॅस्टिक सेंटर आणि क्रीडा संकुल उभारण्यात आले असून येत्या एप्रिल महिन्यात या संकुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेने बांधकाम विकास हस्तांतरणाच्या (कंन्स्ट्रक्शन टीडीआर) माध्यमातून हाती घेतलेल्या महत्वाच्या कामांपैकी हा एक प्रकल्प मानला जातो. टाटा समूहाच्या माध्यमातून या वास्तूची उभारणी करण्यात आली असून सुसज्ज असे हे केंद्र बांधून पुर्ण होत आले आहे.

पोखरण रस्ता क्रमांत दोन येथे महापालिकेने बांधकाम विकास हस्तांतरण हक्काच्या माध्यमातून टाटा समुहाकडून ही वास्तू बांधून घेतली आहे. या संकुलाच्या बांधकामासाठी टाटा समुहाने ३८ कोटी रुपये खर्च केले आहेत. याठिकाणी महापालिकेस केवळ खेळाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. ठाणे तसेच आसपासच्या परिसरातील जिम्नॅस्टिकपटूंना सरावासाठी मुंबईत जावे लागत आहे. हे लक्षात घेऊन शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अशाप्रकारचे संकुल उभारणीसाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यासाठी त्यांनी टाटा गृह समूहाचे संचालक आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते संजीवन सिंग यांची भेट घेऊन पोखरण भागातील टाटा समुहाच्या सुविधा भुखंडावर अशाप्रकारचे संकुल बांधून देण्याबाबत चर्चा केली होती. सिंग यांनी अशा संकुलाच्या आखणीची तयारी दाखविल्यानंतर महापालिकेपुढे हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यास आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मान्यता दिली. या संकुलाचे बांधकाम आता पुर्ण झाले असून महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संकुलाच्या कामाचा पहाणी दौरा नुकताच आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान, येत्या एप्रिल महिन्यात क्रीडा संकुलाचे लोकार्पण करण्यात येईल, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.

जिम्नॅस्टिक केंद्र असे..

’ या जिम्नॅस्टिक सेंटरचे एकूण क्षेत्रफळ तब्बल ८३ हजार चौरस फुट इतके आहे.

’ या केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

’ याठिकाणी ६ प्रकारचे जिम्नॅस्टिक फ्लोअर येथे आहेत.

’ आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांचे याठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार असून त्या खेळांचे सराव करण्याची सुविधाही याठिकाणी असणार आहे.

’ ३०० प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे.

’ शंभर वाहने सामावतील इतके मोठे वाहनतळ, उपाहारगृह, स्वच्छतागृह, संगीत खोली, व्हीआयपी कक्ष, योग केंद्र अशा सुविधाही येथे उपलब्ध करून देणार.