रुग्णालयाच्या आवारात १४ तास मृत्यूशी झुंज; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीची मागणी

भाईंदर: श्वासोच्छवासाचा त्रास झाल्याने भाईंदर पश्चिम परिसरातील शासकीय पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात घेऊन गेलेल्या वृद्ध व्यक्तीला प्रवेश न दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे साधारण १४ तास मृत्यूशी झुंज देत हा वृद्ध व्यक्ती रुग्णालयाच्या आवरत वाट पाहत बसला होता. या वृत्ताची दखल घेत संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी केली आहे.

मीरारोडच्या पेनकर पाडा परिसरात राहणारे हेमंत सावे (५५) यांना शुक्रवारी रात्री श्वासोच्छवास त्रास होऊ  लागल्यामुळे स्थानिक समाजसेवक यांनी आरोग्य विभागाला कळवले. रात्री ८.३० वाजता रुग्णवाहिकेतून त्यांना पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्यांना रुग्णालयात प्रवेश न दिल्याने रात्रभर रुग्णालयाच्या आवारात तिष्ठत राहावे लागले. शनिवारी सकाळी ११ वाजता या वृद्ध व्यक्तीची बायको रुग्णालयात भेटण्यासाठी गेले असता सदर धक्कादायक बाब समोर आली.

रुग्णालयांच्या बाहेर असलेल्या कठडय़ावर आपला नवरा बेशुद्ध अवस्थेत पडलेला पाहून तात्काळ रुग्णालयात घ्या अशी विनवणी केली असता हा दारुडा आहे इथे प्रवेश नाही आहे निघून जा..असे उत्तर पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातून देण्यात आले. या अवस्थेत या बाईंनी आपल्या नवऱ्याला कसेबसे रिक्षातून थेट बोरिवलीमधील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेली असता त्या ठिकाणी मृत घोषित करण्यात आले. या गोष्टीची गंभीर दखल घेत संबंधित रुग्णालयातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी देवेंद्र फडवणीस यांनी मीरा-भाईंदर दौऱ्यावर असताना पालिका आयुक्तांना केली आहे.