आनंद मिनेझिस हा वसईतला धावपटू. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा आनंद पहिला खेळाडू. राष्ट्रीय पातळीवर शंभराहून अधिक पदके त्याने मिळवली आहेत. तर जागतिक रेल्वे गेम्स, दक्षिण आशियाई स्पर्धासह जागतिक पातळीवर अनेक स्पर्धामध्ये सुवर्णपदकांची कमाई केलेली आहे. जागतिक क्रमवारीत १२६ व्या क्रमांकावर तो पोहोचला होता. भारत सरकारच्या क्रीडा कार्यक्रमाचा तो मुख्य संचालक आहे. सध्या अमेरिकेतल्या बोस्टन येथे आनंद प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. खेळाडू असून त्याने वाचनाची आवड जोपासली आहे. खेळ आणि फिटनेसवरील पुस्तकांचा अफाट संग्रह आजही त्याच्या वसईच्या घरी आहे.

माणिकपूरच्या नौपाडा गावात माझं बालपण गेलं. माणिकपूरच्या सेंट झेवियर्स या मराठी माध्यमाच्या शाळेत माझं शिक्षण झालं. अभ्यासात फारशी प्रगती नव्हती. त्यामुळे पुस्तकांपासून लांबच होतो. खरं सांगायला गेलो तर दहावीपर्यंत शाळेच्या पुस्तकांव्यतिरिक्त मी काहीच पुस्तकं वाचलेली नव्हती. नववीला असताना धावण्याच्या शर्यतीत मी राष्ट्रीय स्तरावर गेलो. महाविद्यालयानंतर पूर्णपणे खेळाकडे वळलो. त्याच वेळी खेळाबरोबर माझे वाचनही वाढू लागले.

१९९७ पासून मी खेळांमध्ये एकामागोमाग एक टप्पे गाठत गेलो. खेळ हा मैदानी असतो. पण त्याची मानसिक तयारी करणे आवश्यक असते. हा मानसिक तयारीचा खुराक मला पुस्तकातून मिळत गेला. मला वाचायची सवय लागली. पण पारंपरिक कथा- कांदबऱ्यांपेक्षा माझा खेळांशी संबंधित पुस्तकांकडे अधिक ओढा होता. मी जगभरातील प्रसिद्ध खेळांडूच्या जीवनावरील पुस्तके, आत्मचरित्रे वाचण्याचा सपाटा लावला. त्यामुळे या खेळाडूंनी केलेले परिश्रम, त्यांची इच्छाशक्ती, ध्येय गाठण्यासाठी केलेला खडतर प्रवास मला समजला. त्यातून मला खेळण्यासाठीची स्फूर्ती व कामगिरी टिकवून ठेवण्यासाठी मानसिक बळ मिळत गेले. अनेक खेळाडूंच्या जवळ गेलो. खेळाडू म्हटले की शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. त्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याची पुस्तके मिळवून वाचू लागलो. या पुस्तकांचा संग्रह माझ्या घरी होऊ  लागला. आजही माझ्या घरात खेळ, फिटनेस याच संदर्भातील पुस्तकांचा भरणा आहे.

खेळ म्हटला की जय-पराजय असतो. विविध स्पर्धातील राजकारण असते. पराभव पचविण्याची मानसिकता लागते. अपयशातून नव्याने मोठय़ा हिमतीने उभे राहावे लागते. ही हिम्मत, हे बळ मला पुस्तकातून मिळत गेले. मी खेळाच्या निमित्ताने आजही जगभर फिरत असतो. तेथील नियतकालिके, मासिके, वर्तमानपत्रे यातील वाचनावर माझा भर असतो. जगभरातील ज्ञान त्यात सामावलेले असते. अमेरिकेत बसस्थानकावर मासिके, नियतकालिके, मार्गदर्शिका असतात. ते मी आवर्जून वाचतो. त्या प्रवासात आणि तेथे मी एकटाच असतो. त्या वेळी ही पुस्तके माझी सोबत करतात. वाचनातून मला जग कळत गेले. परदेशात मार्गदर्शन नाही. त्या वेळी ही पुस्तके, गाईड, मासिके माझे मार्गदर्शक बनले.

या जगात अफाट ज्ञानसागर आहे आणि तो जर कशात असेल तर या पुस्तकात सामावलेला आहे. फिटनेस ही संकल्पना आपल्याकडे फार मर्यादित स्वरूपात आहे. पण जगभरात त्यावर अफाट संशोधन झाले आहे. दररोज त्यात संशोधन होत असते. नवनवीन तंत्रे येत असतात. हे सारे मला वाचनातून मिळत गेले. परदेशातील अनेक नियतकालिके मी नियमित लावून घेतली आहेत. त्यामुळे माझ्या खेळाच्या पेशात मी अपडेट राहतो. बॉब किचन यांचे ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड, बॉब जेम्स यांचे फिजिकल फिटनेस ही त्यातील काही आवर्जून नमूद करावी अशी नावे आहेत.   वाचनामुळे जगातील लोकांचे विचार मला कळत गेले. माझ्या ज्ञानात भर पडत गेली. विमान प्रवासही माझ्या वाचण्याची आवडती जागा आहे.

मी माझा बर्गर विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायासाठी बिझनेस मॅनेजमेंटच्या पुस्तकांचा मोठा आधार मिळाला. व्यवसाय कसा करावा त्याचे तंत्र आणि मंत्र मला पुस्तकांनी दिले. मी खेळाडू आहे, मग वाचायला वेळ कसा मिळतो असे कुणी विचारल्यावर मला हसायला येते. कारण वाचनाशिवाय जगणे ही कल्पनाच मला सहन होत नाही. तासन्तास बसून वाचणे या रूढ संकल्पनेत मी बसत नाही. पण अवांतर वाचनातही ज्ञान मिळत राहते. माझे शिक्षण मराठी माध्यमात होते. सुरुवातीचा काळ वगळता मला इंग्रजी भाषेची कधी अडचण आली नाही. आजही माझे सगळे वाचन हे इंग्रजी भाषेतूनच होत असते. पुस्तके माझ्यासाठी संदर्भ ग्रंथ आहेत, ज्ञान देणारे माध्यम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वाचन आणि पुस्तकांमुळेच मी जगाशी जोडला गेलेलो आहे. माझ्यात शारीरिक गुण होते म्हणून मी खेळाडू बनलो. परंतु जर वाचन नसतं तर मी खेळाडू म्हणून टिकलो नसतो.

शब्दांकन- सुहास बिऱ्हाडे