ठाणे लोकसभा मतदारसंघातून आनंद परांजपे यांना उमेदवारी? कल्याणमधून बाबाजी पाटील यांच्या उमेदवारीचा विचार

जयेश सामंत, ठाणे</strong>

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर माजी खासदार आनंद परांजपे यांचे नाव पुढे आले आहे. ठाण्यात झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत ठाणे येथून आनंद परांजपे तर कल्याणमधून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.

ठाण्यातून गणेश नाईक यांनी निवडणूक लढवावी असा पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आग्रह होता. मात्र, नाईक आणि त्यांचे पुत्र संजीव हे दोघेही इच्छुक नसल्याने परांजपे यांचे नाव पुढे आले असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी पाच वर्षांपूर्वी संजीव नाईक यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. नरेंद्र मोदी यांच्या लाटेपुढे नवी मुंबईतही नाईक यांना ४५ हजार मतांनी पिछाडीवर जावे लागले होते. यंदा ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्यास संजीव नाईक इच्छुक नसल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात त्यांचा पूर्वीसारखा संपर्कही राहिलेला नाही. ठाणे तसेच मीरा-भाईंदर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला. ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या ठाणे पालिका हद्दीत राष्ट्रवादीचे जेमतेम आठ नगरसेवक निवडून आले असून तेदेखील हनुमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला यांच्या स्थानिक प्रभावामुळे शक्य झाले आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादीची सत्ता असली तरी तेथेही सेना, भाजपची ताकद वाढली आहे. या पाश्र्वभूमीवर पक्षाध्यक्ष पवार आणि ठाण्यातील काही नेत्यांचा आग्रह असतानाही गणेश नाईक यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचे समजते. नाईक यांनी नकार दिल्याने आनंद परांजपे यांचे नाव पुढे आले आहे. खुद्द शरद पवार यांनीही परांजपे यांच्या नावाबाबत अनुकूलता दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाण्यात फॉर्च्यून हॉटेल येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार आणि माजी महापौर मनीषा भोईर यांच्या नावांचीही चर्चा करण्यात आली. परंतु, ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आवाका पाहता परांजपे यांच्या पारडय़ात पक्षनेत्यांचे झुकते माप पडले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघातून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आणि ठाणे महापालिकेतील नगरसेवक बाबाजी पाटील यांचे नाव पुढे आले आहे. बाबाजी पाटील हे नाईक यांचे कट्टर समर्थक मानले जातात. कळवा-मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांच्या नावावर सहमती दर्शविली आहे. कल्याण मतदारसंघ मनसेला सोडण्यात येईल, अशी चर्चा मध्यंतरी सुरू होती. मात्र, राष्ट्रवादीच्या एका मोठय़ा गटाने त्याला विरोध केल्याने येथून राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडणूक लढवेल, अशी शक्यता आहे.